दिघी पोर्ट लिमिटेड कंपनीचा ताबा आता अदानी ग्रुपकडे आल्याने सुमारे 3500 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या दिघी बंदर विकासाच्या कामाला आता खर्या अर्थाने वेग प्राप्त झाला आहे. जेऐनपीटीच्या धर्तीवर दिघी बंदर विकसित केले जाणार आहे.
दिघी बंदरासाठी आगरदांडा व दिघी परिसरातील सुमारे 1600 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. या बंदराचा विकास आणि त्यानंतर कारभार चालविण्यासाठी केंद्र सरकारने 50 वर्षांची सवलत दिली आहे. हे बंदर फ्रेट कॉरिडोरचाही एक भाग असून ते लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे यासाठी बंदर विभागाचे प्रयत्न आहेत.
दिघी पोर्ट लिमिटेड कंपनी गेल्या 10 ते 15 वर्षांपासून दिघी बंदराचा विकास करीत आहे. दिघी परिसरात बंदराचा विकास झाला आहे. मात्र मोठंमोठी जहाजे येथे फारच कमी प्रमाणात येत आहेत. आगरदांडा परिसरात बंदर विकसित होणे अद्यापही बाकी आहे. आता दिघी पोर्ट लिमिटेड कंपनीचा ताबा गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपने घेतला आहे. त्यामुळे दिघी बंदराच्या विकासकामाला गती आली आहे.
अदानी ग्रुपने सर्वप्रथम बंदराच्या आगरदांडा परिसराच्या विकासाकडे लक्ष देत आहे. गेले कित्येक वर्ष हा भाग दुर्लक्षित होता. येत्या काही दिवसातच आगरदांडा येथील विकासाला वेग येणार असून, सर्व अभियंते येथे दाखल झाले आहेत. येथील बंदराच्या विकासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे अदानी ग्रुपने जाहीर केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बंदर विकसित करण्याच्या कामाला वेग प्राप्त झाला आहे. जहाजातून येणारा माल उतरवण्यासाठी मोठंमोठ्या क्रेन उभारण्याचे काम प्रगती पथावर आहे. दिघी व आगरदांडा परिसरात अदानी ग्रुपच्या अभियंत्यांची वर्दळ वाढली असून बंदर विकासाच्या कामाला वेग प्राप्त झाला आहे. गुजरातमधून कुशल कामगार येत असून, त्यांना राहण्याकरीता अदानी ग्रुपने मुरूड शहरातील चांगली घरे घेतली आहेत. स्थानिकांनासुद्धा प्रशिक्षित करण्यात येणार असून, त्यामधून येथे अनेक रोजगार उपलब्ध होणार आहेत. यांचा विचार करून स्थानिक विद्यार्थ्यांनी मटेरिअल मॅनेजमेंट, मर्चट नेव्ही, मरिन फिटर, डिझेल मेकॅनिकल, क्रेन ट्रेनर, फायर अँड सेफ्टी व इतर कोर्सेस करून सर्टिफिकेटस मिळवावीत, जेणे करून या कंपनीत त्यांना रोजगार मिळेल.
केंद्र शासनाने 110 कोटी रुपये खर्च करून आगरदांडा ते इंदापूर या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करून बंदर विकासाचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. दुसर्या टप्प्यात आगरदांडा ते रोहा रेल्वे मार्गाने जोडण्यात येणार असून, या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे.
काही स्थानिक ठेकेदारांची जुनी देणी आहेत. ती देयके कशा पद्दतीने देता येतील, या बाबतही अदानी ग्रुपने हालचाली सुरु केल्या आहेत.
स्थानिक नागरिक, ठेकेदार यांच्यात सुसंवाद सुरु केला आहे. अडथळा येणारी सर्व कामे मार्गी लावण्याचे काम सुरु झाले आहे.
आंतरराष्ट्रीय दिघी बंदराच्या संपुर्ण विकासाला आणखीन काही वर्ष लागणार असून, हे काम थांबू नये यासाठी प्रत्येकाशी बैठक घेणे, समन्वय साधणे, चर्चा करणे या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. हेड ऑफ दिघी पोर्ट आणि हेड इंजिनिअरिंग सर्विसेस या जागांसाठी अधिकारी नियुक्त करून अदानी ग्रुपने आपल्या कामाला सुरूवात सुरु केली आहे. त्यामुळे सध्या बंदर विकासाच्या कामाने वेग घेतला आहे.
-संजय करडे, खबरबात
RamPrahar – The Panvel Daily Paper