भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यामध्ये देखील किती शक्ती एकवटू शकते याची झलक सोमवारी कोल्हापुरात बघायला मिळाली. भाजपचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला यापूर्वीच सळो की पळो करून सोडले आहे. या पळापळीच्या नाटकाचा कळसाध्याय जणू कोल्हापुरात बघायला मिळाला. किरीट सोमय्या यांच्या पाठीमागे हजारो भाजप कार्यकर्त्यांची ताकद एकवटलेली आहे याची जाणीव सत्ताधार्यांना आता तरी झाली असावी, अशी अपेक्षा आहे. आधीच घायाळ झालेल्या महाविकास आघाडी सरकारमधील तालेवार नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या ताज्या आरोपांमुळे अस्वस्थ होणे साहजिक आहे कारण सोमय्या यांचे आरोप हवेतील गोळीबाराप्रमाणे नसतात. आरोपांसोबत ते पुराव्याखातर कागदपत्रेही सादर करतात आणि तपास यंत्रणांना अक्षरश: कामाला लागावे लागते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात सोमय्या यांनी रान उठवले आणि कथित 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची हजारो कागदपत्रे ईडीच्या ताब्यात दिली. एवढेच नव्हे तर कोल्हापूरनजीकच्या कागल येथील पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवण्यासाठी ते मुलुंडहून निघाले. मुलुंड येथे देखील पोलिसांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून त्यांना कराड येथे उतरवण्यात आले. गुन्हेगार मोकाट फिरत असून तक्रारदारालाच अटकाव होण्याची ही भारतीय लोकशाहीतील पहिलीच वेळ असावी. विशेष म्हणजे किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या पोलिसी कारवाईची गंधवार्तादेखील मुख्यमंत्र्यांना नव्हती असे आता सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या गृहखात्याने परस्पर ही कारवाई केल्याचे कळते. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले मंत्रीमहोदय राष्ट्रवादीचे आणि गृहखातेदेखील राष्ट्रवादीकडेच अशी परिस्थिती असताना तक्रारदाराचे काय होणार हे वेगळे सांगायला नकोच. यानिमित्ताने महाविकास आघाडीतील महाबिघाडी मात्र ढळढळीतपणे जनतेच्या समोर आली. सत्ताधारी आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये काहीही आलबेल नाही हेच यावरून लक्षात येते. सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना हसन मुश्रीफ यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु तो दुबळा ठरला. कारण त्यांच्या बाजूने बोलण्यासाठी त्यांच्याच पक्षाचे कोणीही नेते उभे राहिले नाहीत. शिवसेनेने तर हात झटकले आणि काँग्रेसने तर पहिल्यापासूनच मिठाची गुळणी धरली आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका करण्याचा क्षीण प्रयत्न केला, परंतु त्यांच्या टीकेचा रोख कायम केंद्र सरकारकडेच असतो. त्यामुळे हसन मुश्रीफ प्रकरणी, त्यांच्या टीकेची दखल माध्यमांनी फारशी घेतली नाही. गेले काही महिने निरनिराळ्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आणि घोटाळ्यांचे आरोप होत आहेत. त्यातील दोन मंत्री तर तुरुंगाच्या दारापर्यंत पोहोचले आहेत. आणखी एक-दोघा मंत्र्यांची अनधिकृत बांधकामे कायद्याच्या कचाट्यात सापडली आहेत. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचे घोटाळे एक-दोन दिवसांत बाहेर काढू, असा सज्जड इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकाला प्रश्न पडतो की या सरकारमधील सरळमार्गी नेता आहे तरी कुठला? महाविकास आघाडीतील नेत्यांना पैसे कसे खावेत याचेही ज्ञान नसल्याची जळजळीत टीका चंद्रकांत पाटील यांनी केली, ती काही उगाच नव्हे. लोकांचे शिव्याशाप आणि आरोपांचा भडिमार सहन करत हे सरकार आणखी किती काळ टिकाव धरू शकते हे आता बघायचे.
Check Also
शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचा पनवेलमध्ये दर्शन सोहळा
नियोजन बैठकीत तयारीचा आढावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरातील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 18 …
RamPrahar – The Panvel Daily Paper