Breaking News

तळोजा एमआयडीसी सुरक्षेबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले लक्ष

पनवेल : प्रतिनिधी

तळोजा एमआयडीसीमधील कंपनीत वारंवार लागणार्‍या आगीबाबत आणि कामगारांच्या सुरक्षेबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले.

तळोजा एमआयडीसी परिसरातील घोट गावाच्या शेजारी असलेल्या एम. एस. आर. बायोटेक अ‍ॅण्ड न्यूट्रीशन लिमिटेड या केमिकल कंपनीत 16 डिसेंबर 2018 रोजी पॅकिंग व फिल्टरचे काम सुरू असताना अचानक भीषण स्फोट होऊन आग लागली व त्यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. सदर कंपनीमध्ये कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याच सुविधा नाहीत, तसेच या कंपनीतील कामगारांचा विमा उतरविला नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. घोट गावाच्या परिसरात असलेल्या कंपनीमध्ये स्फोट होऊन आग लागल्याची दुसरी घटना असून गेल्या सहा महिन्यांत पाच ते सहा वेळा आग लागण्याचे प्रकार घडले आहेत.  या प्रकरणी शासनाने चौकशी करून एम. एस. आर. बायोटेक अ‍ॅण्ड न्यूट्रीशन या केमिकल कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई करण्याबाबत तसेच स्फोटात मृत्यू पावलेल्या कामगाराच्या कुटुंबाला व जखमी कामगारांना आर्थिक मदत देण्याबाबत कोणती कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात दाखल केला होता.

राज्याचे कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांनी या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, एम. एस. आर. बायोटेक अ‍ॅण्ड न्यूट्रीशन लिमिटेड या केमिकल कंपनीत 16 डिसेंबर 2018 रोजी पॅकिंगचे व फिल्टरचे काम सुरू असताना अचानक भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाला. कंपनीने कामगारांना सुरक्षिततेच्या सुविधा दिलेल्या नव्हत्या तसेच कंपनीतील कामगारांचा विमा उतरविलेला नव्हता हे खरे आहे. यापूर्वी 29 ऑक्टोबर 2018 रोजी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड तळोजा या कारखान्यात स्फोट होऊन एक कामगार जखमी झाला होता. मागील सहा महिन्यांत तळोजा एमआयडीसीत आग लागण्याच्या तीन घटना

घडलेल्या आहेत. एम. एस. आर. बायोटेक अ‍ॅण्ड न्यूट्रीशन लिमिटेड या कारखान्यात दिनांक 16 डिसेंबर 2018 रोजी पीक्यूडी हे पावडर स्वरूपातील मटेरीयल चाळणीतून चालून पॅकिंग करण्याचे काम सुरु असताना अचानक स्फोट होऊन आग लागली व या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी चौकशी करण्यात आली असून चौकशीत या कारखान्यात दोन कामगार कामावर ठेवून पीक्यूडी हे धोकादायक पावडर चालून पॅकिंग करण्याची प्रक्रिया करण्यात येत होती. पीक्यूडी पावडर ही स्फोटक स्वरूपाची असल्याने या आस्थापनेस कारखाने अधिनियमांच्या तरतुदी लागू होतात. परंतु चौकशीत कारखाना विना परवाना चालत असल्याचे आढळून आले. त्याकरिता महाराष्ट्र कारखाने नियम, 1963 च्या नियम 4(1) व 4(4) च्या भंगाबाबत, तसेच कारखान्यात  पीक्यूडी हे धोकादायक (ज्यामुळे स्फोट होऊ शकतो असे) मटेरियल हाताळताना आवश्यक ती काळजी न घेतल्याने महाराष्ट्र कारखाने नियम 1963 च्या नियम 70 च्या भंगाबाबत कारखान्याच्या भोगवटादाराविरुद्ध मा. मुख्य न्यायदंडाधिकारी अलिबाग रायगड यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. मृत कामगाराच्या वारसांना व्यवस्थापनाने मा. कामगार न्यायालयामार्फत 8 लाख 98 हजार 20 रुपये एवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिलेली आहे. 

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply