लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ज्या लढतींकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे त्यापैकी एक म्हणजे मावळ मतदारसंघातील बारणे विरुद्ध पवार अशी ‘बिग फाईट’. पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यातील तिसरी पिढी निवडणूक रिंगणात उतरली आहे. त्यांच्यासमोर आव्हान आहे ते विद्यमान खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे यांचे. हा सामना शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात असला, तरी मावळच्या मैदानात सहकारी पक्षांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.
सन 2009मध्ये नव्याने तयार झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे गजानन बाबर यांनी पहिल्या विजयाची नोंद केली. त्यांनी राष्ट्रवादीचे आझम पानसरे यांना धूळ चारली होती. गेल्या वेळी म्हणजेच 2014 साली शिवसेनेने उमेदवार बदलला आणि श्रीरंग बारणे यांना संधी दिली. मोदी लाटेत बारणे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे लक्ष्मण जगताप यांना पराभूत केले, तर राष्ट्रवादीने आयात केलेला उमेदवार राहुल नार्वेकर हे तिसर्या क्रमांकावर फेकले गेले. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणारा हा मतदारसंघ शहर, निमशहरी आणि ग्रामीण असा मिश्र लोकवस्तीचा आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना श्रीरंग बारणे यांनी घाटमाथ्यावर आणि घाटाखाली समन्वय ठेवला. त्यामुळे यंदाही त्यांनाच उमेदवारी मिळणार हे अपेक्षित होते. झालेही तेच. दुसरीकडे, राष्ट्रवादीकडे स्थानिक तूल्यबळ उमेदवाराची वानवा होती. सलग दोनदा सपाटून मार खाल्ल्यानंतर यंदा मावळसाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांची वर्णी लागली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माढ्यातील माघारीनंतर पार्थ यांची मावळमधून जाहीर झालेली उमेदवारी संपूर्ण पवार घराण्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
गेल्या वेळी मावळ लोकसभा मतदारसंघात शेकापने निवडणूक लढविली होती. शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे लक्ष्मण जगताप सध्या भाजपचे आमदार आहेत. वेळोवेळी होणार्या निवडणुकांमध्ये पराभव पदरी येत असल्यामुळे यंदा शेकापने लोकसभेला स्वतःचा उमेदवार उभा न करता राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. याच शेकापचा एकेकाळी रायगड जिल्ह्यात दरारा होता. शेकाप विरुद्ध अन्य सर्व पक्ष अशा लढती तेव्हा होत असत. शेकापच्या ध्येय्य-धोरणांना नव्या पिढीतील नेतृत्वाने तिलांजली दिल्याने या पक्षाला उतरती कळा लागल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. हल्ली इतरांना सोबत घेऊन शेकापला निवडणुका लढवाव्या लागतात. लोकसभेच्या रणांगणात तर शेकाप पाठिंब्यापुरता उरला आहे. तरीही स्वपक्षाचे अस्तित्व नगण्य असल्याने घाटाखाली विशेषत: पनवेल, उरणमध्ये राष्ट्रवादीची मदार प्रामुख्याने शेकापवर आहे. खरेतर शेकापलाच सध्या आधाराची गरज आहे. सततचे पराभव, सक्षम नेतृत्वाचा अभाव, कार्यकर्त्यांच्या पक्षांतरामुळे लागलेली गळती यामुळे शेकापमध्ये पहिल्यासारखा जोश दिसत नाही; तर महाआघाडीतील तिसरा प्रमुख घटक पक्ष काँग्रेसचे अस्तित्व असून नसल्यासारखे आहे. म्हणूनच प्रचाराची धुरा अजित पवारांनी स्वतःकडे ठेवली आहे.
बरं एवढे करूनही राष्ट्रवादीला विजयाची शाश्वती नसल्याने ज्या महाआघाडीत परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला स्थान नाकारण्यात आले, त्याच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून पाचारण करण्यात आले आहे. राज हे आक्रमक भाषणासाठी ओळखले जातात. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीचे वाभाडे काढणार्या राज यांनी या वेळी मात्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले लक्ष्य केले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी गुजरातमध्ये जाऊन मोदींचा गौरव केला होता. त्यामुळे यंदा स्वत:चे उमेदवार निवडणूक रिंगणात न उतरवता त्यांनी दोन्ही काँग्रेसचा प्रचार आणि भाजपवर प्रहार करण्यामागचे ‘राज’ काय, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
पार्थसाठी पवार कुटुंबीय जे जे शक्य आहे ते ते करीत आहेत. याचे कारण साधे आणि सरळ आहे ते म्हणजे पार्थ पडल्यास पवारांच्या प्रतिष्ठेस धक्का बसेलच, शिवाय विधानसभा निवडणुकीसाठी परिस्थिती आणखी बिकट होईल. या पार्श्वभूमीवर अजित पवार जंग जंग पछाडत आहे. असे असले तरी राष्ट्रवादीच्या या उमेदवाराची पर्यायाने पवार कुटुंबीयांची पुढील राजकीय वाटचाल सहकारी पक्ष त्यांना कितपत साथ देतात यावर अवलंबून आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेची बाजू मावळ लोकसभा मतदारसंघात चांगली आहे. त्यांचे दोन आमदार आणि हक्काची मते आहेत, पण राष्ट्रवादीचे भवितव्य जसे सहकारी पक्षांवर अवलंबून आहे, तशीच शिवसेनेचीही भिस्त जुना मित्र असलेल्या भारतीय जनता पक्षावर आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे. सहापैकी सर्वाधिक तीन आमदार एकट्या भाजपचे आहेत. पनवेल आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका भाजपच्या ताब्यात आहेत. शिवाय इतर काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे प्राबल्य आहे. अगदी ग्रामपंचायतींमध्येही या पक्षाचे सरपंच, सदस्य विराजमान झाले आहेत. ज्या भाजपची पूर्वी इतरांसोबत फरपट व्हायची तोच पक्ष आता मात्र प्रतिस्पर्ध्यांना अस्तित्वासाठी झगडायला लावत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे भाजपची साथ शिवसेनेसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
भाजपने युतीधर्म निभावत स्वतःला प्रचारात झोकून दिले आहे. शिवसेना उमेदवाराचा विजय म्हणजे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी टाकलेले एक पाऊल असणार आहे. त्याचप्रमाणे लोकसभा ही विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असल्याने आतापासूनच आगामी रणनीतीच्या दृष्टीने अंदाज घेता येणार असल्याने भाजप नेत्यांनी मावळमध्ये श्रीरंग बारणेंच्या पाठीशी आपली संपूर्ण यंत्रणा व ताकद उभी केली आहे. याखेरीज रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना यांचा महायुतीमध्ये समावेश आहे. हे घटक पक्ष मावळमध्ये यथातथा आहेत, परंतु चुरशीच्या लढतीत त्यांच्या मतांचे दानही महत्त्वाचे ठरेल.
एकंदर लेखाजोखा ध्यानात घेता कागदावर महायुती वरचढ दिसते, परंतु कोणतीही निवडणूक ही केवळ कागदावरील समीकरणे लक्षात घेऊन नव्हे; तर प्रत्यक्षात लढाईच्या वेळी काय घडू शकते याचा वेध घेऊन मैदानावर लढली जाते. त्यातच महाआघाडीकडून पवार घराण्यातील उमेदवार असल्याने गाफील राहण्याची चूक महायुतीचे नेते करणार नाहीत. या तगड्या लढतीत मुख्य प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी आणि शिवसेनेबरोबरच महाआघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांची कामगिरी कशी होते यावर मावळमधील खरा मावळा कोण हे ठरणार आहे.
-समाधान पाटील (9004175065)
RamPrahar – The Panvel Daily Paper