Breaking News

भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा वध करण्यासाठी मला शक्ती दे!

भाजप नेते किरीट सोमय्या यांची अंबामातेकडे प्रार्थना

कोल्हापूर ः प्रतिनिधी
भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी (दि. 28) कोल्हापूर दौर्‍यात महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरून अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. सोमय्या म्हणाले, अंबामातेकडे मी प्रार्थना केली आहे की, मातेने त्या वेळी राक्षसाचा वध केला होता. आता महाराष्ट्राला भ्रष्टाचाररूपी एक शाप मिळालाय, भ्रष्टाचाराचा राक्षस तयार झाला आहे, त्याचा वध करण्यासाठी मला शक्ती दे.
एकीकडे महाराष्ट्राचे साडेबारा कोटी लोक भ्रष्टाचाराच्या विरोधात क्रांतीच्या स्वरूपात रस्त्यावर असतात. आम्हाला प्रार्थना करतात आणि हे राक्षसरूपी सरकार आम्हाला जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न करते. महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्याची क्रांती आता सुरू झाली आहे. अंबामाते, आम्हाला आशीर्वाद दे, असेदेखील सोमय्या म्हणाले.
दरम्यान, अनिल परब ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाल्याबद्दल विचारणा केली असता त्यावर त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. अनिल परबांची गोड बातमी म्हटले तर योग्य दिसणार नाही, पण भावना गवळीचा पार्टनर सईद खान, ज्याने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता त्या सईद खानला आज अटक केली आणि तो जेलमध्ये गेला, असे सोमय्या यांनी सांगितले.
सोमय्या पुढे म्हणाले, घोटाळे उघड करणे आपले काम आहे. आमचे हसन मुश्रीफ हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आनंद अडसूळांना अटक करण्यासाठी गेले असता तेही हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. काही लोक गायब होतात. माझे काम आहे की ज्यांनी राज्याच्या जनतेला लुटले आहे तो घोटाळा उघड करणे आणि त्याचा पाठपुरावा करणे.
हसन मुश्रीफांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल
कोल्हापूर दौर्‍यावर असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात जाऊन राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने 1500 कोटींचा घोटाळा केला आहे. ही कलापण वेगळीच आहे. मुश्रीफांनी स्वतःच्या ग्रामविकास खात्याच्या कामाचे टेंडर जावयाच्या कंपनीला दिले. ज्या कंपन्या अस्तित्वात नाहीत त्या कंपन्यांमधून पैसे आले. ग्रामविकास खात्याने सगळ्या ग्रामपंचायतींसाठी निविदा काढल्या, असा आरोप सोमय्या यांनी या वेळी केला.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply