Breaking News

महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपलेत काय?; अमली पदार्थ तस्करीवरून भाजपची टीका

मुंबई ः प्रतिनिधी

अमली पदार्थांच्या तस्करीवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर बोचर्‍या शब्दांत टीका केली आहे. मुंबईत क्रुझवर सुरू असलेल्या पार्टीवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्याचे काम अमली पदार्थविरोधी दलाच्या (एनसीबी) विशेष पथकाकडून करण्यात आले, पण मुंबईत अशा प्रकारे सर्रास ड्रग्जची तस्करी व वापर होत असताना महाराष्ट्राचे पथक आणि गृहमंत्री झोपले आहेत काय, असा सवाल भातखळकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह राज्य सरकारला केला आहे. आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारीची पाळेमुळे मुळासकट मोडीत काढण्याचे सोडून ठाकरे सरकार केवळ टक्केवारी वसुली करण्यात मग्न आहेत, असा आरोपही आमदार भातखळकर यांनी केला आहे. मुंबईसारख्या शहरात इतकी देशविघातक कृत्ये होत असताना राज्याचा गृह विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने या विरोधात जोरदार कारवाई करणे अपेक्षित असताना गृह विभाग मात्र हॉटेल व बारमालकांकडून वसुली करण्यात धन्यता मानत असल्याची टीका भातखळकर यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे, दिवसाढवळ्या खून, बलात्कार, उद्योजक व राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमक्या देणे, अपहरण या आणि अशा गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, मात्र राज्याचे गृहमंत्री हे केवळ सुडाच्या राजकारणात मग्न असल्यामुळे किमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तरी मुंबईतील वाढत चाललेली ड्रग्सची खुलेआम विक्री आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, असा खोचक सल्ला भातखळकर यांनी दिला आहे. पुढे काँग्रेसवर टीका करताना भातखळकर म्हणाले की, एनसीबीकडून टाकण्यात आलेल्या छाप्यात आर्यन खानसह अनेक युवकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून हे सर्व युवक ड्रग्जचे सेवन करीत असल्याचे उघड झाले आहे, पण दुसरीकडे काँग्रेसचे नेते जयराम रमेश व इतर प्रवक्ते हे तर थेट आर्यनच्या बाजूने उभे राहत आहे. जणू यामार्फत ते ड्रग्ज तस्करी व सेवनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे दाखवून देत आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply