मुंबई ः प्रतिनिधी
चिपी विमानतळाचे शनिवारी (दि. 9) उद्घाटन होत असताना सिंधुदुर्गाच्या विकासाच्या आड येणार्यांचा या वेळी जाहीर सभेत भांडाफोड करणार असल्याचा इशारा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सत्ताधारी शिवसेना आणि शिवसेनेचे सिंधुदुर्गातील खासदार विनायक राऊत यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. राणे म्हणाले, 2014 साली मी विमानतळ बांधून पूर्ण केले, पण आता तेच पुढे राहून म्हणतायत आम्ही विमानतळ आणले. मी जी विकासकामे सिंधुदुर्गात आणली, त्या सगळ्याला शिवसेनेने विरोध केला. आता मात्र सांगतात आम्हीच केले. कावकाव करून काही मिळत नाही.
शिवसेनेची हफ्तेबाजी सुरूच
सिंधुदुर्गात शिवसेनेची हफ्तेबाजी सुरू असल्याची टीका या वेळी नारायण राणेंनी केली. शिवसेनेच्या पदाधिकार्यांचा सिंधुदुर्गातील उद्योगपतींना फार त्रास आहे. गाडी घेऊन दिल्याशिवाय त्यांनी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करू दिले नाही. उद्या जाहीर सभेत सगळ्यांची नावे मी सांगणार आहे. विकासाच्या आड येणारी ही लोकं आहेत. त्यांचा भांडाफोड करणार, असेही राणे म्हणाले.