Breaking News

रस्त्यासाठी आदिवासींचा रास्ता रोको

नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर आंदोलन

कर्जत : बातमीदार

वन जमिनीच्या अडथळ्यामुळे माथेरानच्या डोंगरात असलेल्या आदिवासी वाड्यांना जाणारा रस्ता रखडला आहे. वर्षानुवर्षे रस्त्याची मागणी पुर्ण होत नसल्याने या पाच आदिवासी वाड्यांमधील लोकांनी शनिवारी (दि. 16) नेरळ-माथेरान घाटरस्त्यावरील वाहतूक अर्धा तास बंद पाडली. या वेळी महिलांनी आदिवासी नृत्य करीत आंदोलन अधिक काळ टिकवून ठेवले.

माथेरानच्या डोंगरात असलेल्या जुम्मापट्टी धनगरवाडा, बेकरेवाडी, आसलवाडी, नाण्याचा माळ आणि मन्या धनगरवाडा या आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता शासन करीत नाही. त्यामुळे स्थानिक आदिवासी लोकांनी श्रमदान करून आपल्या वाडीत पोहचण्यासाठी रस्ता तयार केला आहे. मात्र हा रस्ता दरवर्षी पावसाळ्यात वाहून जातो. त्यामुळे या भागातील लोकांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होते. स्थानिक आदिवासी कार्यकर्ते जैतु पारधी आणि गणेश पारधी यांनी रस्त्यासाठी आतापर्यंत चारवेळा उपोषणे केली आहेत. मात्र आजपर्यंत रस्ता होऊ शकला नाही. त्यामुळे या आदिवासी लोकांनी नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर शुक्रवारी रस्ता रोको आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्या महिलांनी रस्त्यावर आदिवासी नृत्ये आणि गाणी सादर केली. शनिवार असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक माथेरान येथे या घाटरस्त्याने जात होते. रास्ता रोकोमुळे त्या पर्यटकांची वाहने सुमारे अर्धा तास थांबून राहिली होती.

आदिवासी सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष बुधाजी हिंदोळा, जिल्हा सरचिटणीस गणेश पारधी, जिल्हा उपाध्यक्ष भगवान भगत, विभागीय अध्यक्ष सुरेश दरवडा, ग्रामस्थ बाळू पारधी, बुधाजी निरूगडे, बुधाजी पारधी, बाळू सांबरी, लक्ष्मण सांबरी, जोमा निरगूडे, सुनिल पारधी यांच्यासह महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. नेरळ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता तयार करण्यासाठी  शासनाच्या प्रतिनिधींना तात्काळ सुचविले जाईल, असे आश्वासन देवून पोलीस निरीक्षक तेंडुलकर यांनी या वेळी आदिवासी लोकांना आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले.

Check Also

भारतमाता चित्रपटगृहाशी माझं नातं अगदी वेगळं…

भारतमाता चित्रपटगृहाने छान कात टाकली. ते आजचं झाले.बदल हा होतच असतो, तो व्हायलाही हवा. काही …

Leave a Reply