मुंबई ः प्रतिनिधी
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या नव्या नियुक्त्यांमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. सचिन सावंत यांनी तर पक्षाच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असून हायकमांडला थेट पत्र लिहून प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. मागील 10 वर्षे सचिन सावंत यांनी पक्षाचे मीडिया इन्चार्ज म्हणून काम केले आहे, मात्र नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांना डावलण्यात आले. त्यातच पक्षात मुख्य प्रवक्तेपद तयार करून त्या पदावर सावंत यांना डावलून आता अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवनियुक्त पदाधिकार्यांना जबाबदार्यांचे वाटप केले आहे. यात त्यांनी अतुल लोंढे यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी माजी मंत्री सुनील देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे. सोशल मीडिया विभागाची जबाबदारी विशाल मुत्तेमवार यांच्याकडे, निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी रमेश शेट्टी यांची, तर प्रशिक्षण विभागाची जबाबदारी माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्याकडे देण्यात आली आहे. मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी अतुल लोंढे यांच्याकडे देण्यात आल्याने सावंत यांना लोंढे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागणार आहे. या नव्या बदलामुळे सावंत नाराज झाले असून त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावे, असे पत्र त्यांनी काँग्रेस हायकमांडला लिहिले आहे. सावंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून प्रवक्तेपदाचा टॅगही काढला आहे.
प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी छाटले पंख
याआधी विधान परिषदेच्या आमदारकीसाठीही सचिन सावंत यांचे नाव चर्चेत होते, मात्र नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून सावंत यांचे महत्त्व हळूहळू कमी झाले होते. अशातच त्यांच्याकडील मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यामुळेच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते.