Breaking News

सावरकरांचा शाश्वत विचार कुणीच संपवू शकत नाही -देवेंद्र फडणवीस

मुंबई ः प्रतिनिधी

जो शाश्वत विचार स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडला आहे तो कुणीच समाप्त करू शकत नाही. या देशाला, संस्कृतीला, मराठीला जे सावरकरांनी दिले आहे त्यासाठी मी सावरकरांसमोर नतमस्तक होतो, असे विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपकडून मुंबईच्या गिरगावातील मराठी कट्टा या कार्यक्रमात फडणवीस यांनी सावरकरांविषयीची आपली भूमिका मांडली, तसेच सावरकरांच्या महतीविषयी बोलताना त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एका कृतीचा दाखलादेखील दिला आहे. 1857 हे शिपायांचे बंड नसून तो स्वातंत्र्यलढा असल्याचे वीर सावरकरांनी लिहिले होते. ते लिखाण रासबिहारी बोस आणि सुभाषचंत्र बोस यांनी पुन्हा मिळवले व पुनर्प्रकाशित केले. जेव्हा नेताजींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध पुकारले आणि आझाद हिंद सेना तयार केली तेव्हा या सेनेच्या प्रत्येक अधिकार्‍याला व शिपायाला सांगितले की, हे पुस्तक वाचा. स्वातंत्र्यवीरांचे विचार वाचा. ज्या वेळी स्वातंत्र्यवीरांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न सुरू होता तेव्हा भारताच्या स्वतंत्र राज्याचा झेंडा लावणार्‍या सुभाषचंद्र बोस आणि रासबिहारी बोस यांनी खर्‍या अर्थाने सावरकरांच्या विचारांची प्रेरणा आझाद हिंद सेनेला दिली, असे फडणवीस या वेळी म्हणाले. मी फार लहान माणूस आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलण्यासाठी. त्यांच्या आयुष्याच्या एकेका पैलूवर तास-तासभर बोलणारे वक्ते आहेत. अशा प्रकारे त्यांच्या जीवनातील विचार आपल्यासमोर येतात की असे वाटते ऐकतच राहावे. एका व्यक्तीमध्ये इतके धाडस, इतकी ऊर्जा, इतके पांडित्य कशामुळे येऊ शकते हा आश्चर्यकारक असा विचार आहे, असेही फडणवीस म्हणाले.

तथाकथित बुद्धिवाद्यांना सावरकरांच्या विचारांनीच आपण उत्तर देऊ शकतो!

राष्ट्रभक्ती, देशभक्तीशी बांधिलकी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर देशाकरिता मोठे आहेतच, शिवाय मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करणारेही आहेत. अशा सावरकरांच्या विचारांवर चालत असताना देशात जे काही लोक बुद्धिभेद करीत आहेत या तथाकथित बुद्धिवाद्यांना सावरकरांच्या विचारांनीच आपण उत्तर देऊ शकतो, असा मला विश्वास असल्याचेही फडणवीस या वेळी म्हणाले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply