Breaking News

उमरोली, सावेळे प्रभागात युतीचे कार्यकर्ते सक्रीय

आपल्या बालेकिल्ल्यात आघाडी देणार

कर्जत : बातमीदार

मावळ लोकसभा मतदारसंघात असलेल्या कर्जत विधानसभा मतदारसंघात सावेळे आणि उमरोली या जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देण्यासाठी शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. या जिल्हा परिषद गटांमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे वर्चस्व असून या दोन्ही ठिकाणी खासदार श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी देण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते सरसावले आहेत.

कर्जत तालुक्यातील उमरोली या जिल्हा परिषद गटांमध्ये महायुतीकडून नियोजनबद्ध प्रचार सुरू आहे. तेथे कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ, प्रदीप ठाकरे, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजेश भगत, शिवसेना उपतालुका प्रमुख दशरथ भगत, युवासेनेचे विधानसभा मतदारसंघाचे संघटक संदीप बडेकर, आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष किशोर गायकवाड यांनी नियोजन करून प्रभागातील वाडी वस्ती आणि गावात जाऊन मतदारांच्या गाठीभेटीवर लक्ष केंद्रित केले आहे.

या प्रभागात दहिवली, कोल्हारे, माणगाव, उकरूळ, किरवली, चिंचवली, आसल, आणि उमरोली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्या सर्व ठिकाणी विभाग प्रमुख अविनाश भासे, ठाणगे, महेश विरले यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेत प्रचाराला रंगत आणली आहे.

सावेळे हा जिल्हा परिषद गट शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, त्या ठिकाणी शिवसेना कर्जत तालुका संघटक राजेश जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती उत्तम कोळंबे, तालुका संपर्कप्रमुख सुदाम पवाळी, भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षा सुगंधा भोसले, कर्जत पंचायत समितीचे उपसभापती काशीनाथ मिरकुटे, जिल्हा परिषद सदस्या सहारा कोळंबे, उपतालुका प्रमुख बाबू घारे, आरपीआयचे अरविंद जाधव, शिवसेना सहकार विभाग तालुका संघटक मिलिंद विरले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. महायुतीकडून या ठिकाणी घरोघरी जाऊन मतदारांना भेटून त्यांना आवाहन केले जात आहे. उमरोली आणि सावेळे या दोन्ही जिल्हा परिषद गटात खासदार श्रीरंग बारणे यांना मोठे मताधिक्य अपेक्षित असून ते मिळवून देण्यासाठी युतीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply