Breaking News

हमीभाव भात खरेदी केंद्राच्या ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ द्यावी; कर्जतमधील शेतकर्‍यांची मागणी

कर्जत : बातमीदार

शासनाच्या आधारभूत भात खरेदी केंद्रावर हमी भावाने भात देण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करताना शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी. हमी भावाने भाताची खरेदी मार्च 2022 पर्यंत करण्याचे सरकाराचे निर्देश आहेत त्यालादेखील मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना केली. भाताची खरेदी केंद्र दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरू होतात. या वर्षी ही केंद्र डिसेंबर महिन्यात सुरू होत आहेत. त्यात या वर्षीपासून शासनाने भाताची हमी भावाने खरेदी ऑनलाईन केली आहे. ही ऑनलाईन कार्यपद्धती शेतकर्‍यांसाठी अडचणीची ठरत आहे. या ऑनलाईन पद्धतीला शासनाने डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, मात्र या वर्षी सरता पाऊस लांबल्याने शेतीची कामे नोव्हेंबरपर्यंत सुरू होती. त्यामुळे शेतकर्‍यांना निर्धारित वेळत ऑनलाईन नोंदणी करता आली नाही. कर्जत तालुक्यातील भाताची विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीसाठी फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. या वेळी प्रगत शेतकरी शशिकांत मोहिते, जयवंत शेळके आणि हरिचंद्र वेहले उपस्थित होते. त्याच वेळी भाताची हमी भावाने खरेदी करण्यासाठी राज्य सरकारच्या पणन विभागाने फेब्रुवारी अखेरपर्यंत मुदत दिली आहे. शासनाने त्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी नेरळ विविध कार्यकारी सोसायटी यांच्याकडून करण्यात आली आहे. सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र हजारे, उपाध्यक्ष राजेंद्र विरले आणि ज्येष्ठ सदस्य विष्णू झांजे, पौर्णिमा राऊत आणि सावळाराम जाधव यांनी कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन भाताची खरेदी मुदत फेब्रुवारी 2022 ऐवजी मे 2022 पर्यंत करण्यात यावी, अशी मागणी सोसायटीच्या वतीने केली आहे. कर्जत तालुक्यात सध्या कर्जत, कडाव, कशेळे, नेरळ येथे भाताची खरेदी केली जात आहे, तर आदिवासी शेतकरी यांच्या भाताची खरेदी कशेळे येथे केली जात आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply