नुकसानभरपाई द्या, प्रलंबित मागण्या पूर्ण करा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण काळाधोंडा येथील स्थानिक भूमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने या साखळी उपोषण सुरू ठेवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी केली आहे.
उरण काळाधोंडा येथील स्थानिक भूमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या विविध मागण्या असून यामध्ये 2013च्या केंद्राच्या भू संपादन कायद्याप्रमाणे बाधित शेतकर्यांना मोबदला मिळावा. भविष्यात काळाधोंडा रेल्वे स्टेशन कार्यालयात जी कामगारांची भरती होईल त्यात 100 टक्के भरती ही काळाधोंडा रेल्वे प्रकल्पग्रस्तांची करण्यात यावी. रेल्वेची कामे प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावीत. हाऊसकिपींगच्या कामात रेल्वे प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे. रेल्वे स्थानक आवारातील व्यापारी दुकाने/गाळे ही सरकारी फी आकारून मालकी हक्काने किंवा भाडे तत्वावर सरकारी फी आकारून प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावे. बाधित शेतकर्यांना प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात यावा. रेल्वे स्टेशनला उरण कोट हे नाव देण्यात यावे या विविध मागण्या संदर्भात आजतागायत साखळी उपोषण सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे की, उरण तालुक्यातील कोटनाका-काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पा करिता रेल्वे व सिडको प्रशासन मार्फत संयुक्तरित्या संपादित करण्यात आली त्याबदल्यात प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना कोणतेही नुकसान भरपाई मिळाले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या संतप्त शेतकर्यांनी 27 नोव्हेंबर 2020 पासून कोटनाका येथे रेल्वे प्रकल्पाचे काम बंद करत साखळी उपोषणाला सुरूवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे साखळी उपोषण 84 व्या दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात आले होते, मात्र शेतकर्यांना न्याय न मिळाल्याने ते साखळी उपोषण पुन्हा 15 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू झाले आहे.
मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी (उपोषण स्थळी) नवनीत भोईर, योगेश गोवारी, हेमदास गोवारी, निलेश भोईर, सुनील भोईर, सुरज पाटील, भालचंद्र भोईर, महेश भोईर, कृष्णा जोशी, पुरूषोत्तम पाटील, सुरेश पाटील, चेतन पाटील, प्रसाद गोवारी, अजित भोईर, राजेश भोईर आदी स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार महेश बालदींचा पाठिंबा
आमदार महेश बालदी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणास यापूर्वी भेट देऊन पाठिंबा दिला होता. तसेच रायगड जिल्हाधिकारी यांची बैठक लावू व त्यातून योग्य यो मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते.