मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील फणसाड अभयारण्यात ग्रीन वर्क्स ट्रस्ट व वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 7 ते 9 जानेवारी या कालावधीत पक्षीगणना करण्यात येणार असल्याची माहिती अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी दिली.
फणसाड अभयारण्याचे क्षेत्र मोठे असून समुद्र सपाटीजवळ असल्याने येथे विविध पक्षी वस्ती करावयास येतात. या अभयारण्यातील पक्षांच्या जाती व विविधता शोधण्यासाठी तीन दिवसीय विशेष पक्षीगणना कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती भोसले यांनी दिली.
गतवर्षी सदर पक्षीगणना 6 फेब्रुवारी रोजी लाईन ट्रान्सेक्ट आणि पॉईंट काऊंट या शास्त्रीय पद्धतीने करण्यात आली होती. त्या वेळी अभयारण्याच्या सुमारे 54 चौ.किमी परिसरात एकूण 190 प्रजातींची नोंद करण्यात आली होती, असे ग्रीन वर्क्स ट्रस्टचे निखील भोपाळे यांनी सांगितले.
माशीमार खाटीक, बेडकमुखी, कोतवाल, कोकीळ, टिकलेचा कस्तूर, विविध प्रजातींचे घुबड, निळ्या चष्म्याच्या मुंगशा, मलबारी कवड्या, धनेश, रंगीत तुतारी, कालव फोड्या, तिरचिमणी, कस्तूर आदी पक्षांच्या दुर्मिळ प्रजातींची नोंद गतवर्षी झाली होती. भीमपंखी फुलपाखरे या अभयारण्यात आढळले असून पहिल्यांदाच त्याची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या या पक्षीगणनेत कोणते नवीन पक्षी आढळतात याचे आकर्षण राहणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper