Breaking News

नेरळमध्ये पाकिस्तानचा धिक्कार

कर्जत : बातमीदार

पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नेरळमध्ये रविवारी (17 फेब्रुवारी) रात्री कँडल मार्च काढण्यात आला. त्यात सर्व जातीधर्माचे आणि सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कँडल मार्चनंतर नेरळ रेल्वे स्टेशनबाहेर शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी

झाली होती. कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील जकात नाका येथून ‘नेरळकर’ या नावाखाली निघालेल्या हा कँडल मार्च माथेरान रस्त्याने नेरळ रेल्वे स्टेशन येथे पोहचला. या कँडल मार्चमध्ये नेरळमधील सर्व सामाजिक संघटना, सर्व राजकीय पक्ष आणि सर्व जातीधर्माचे लोक सहभागी झाले होते. कँडल मार्चला सुरुवात होण्याआधी मोहाचीवाडी येथून महिला आणि विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढून आपला सहभाग नोंदविला. त्यानंतर मशाल प्रज्वलित करून आणि भारताच्या झेंड्यासह निघालेल्या कँडल मार्चमधील सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या हातात पेटती मेणबत्ती होती, तर प्रत्येकाने हाताला काळी रिबीन लावली होती, तरुणांच्या हातात काळे झेंडे होते. आम्ही नेरळकर यांनी आयोजित केलेला कँडल मार्च हुतात्मा भाई कोतवाल चौकात पोहचल्यानंतर तेथे शोकसभा घेण्यात आली. त्या वेळी तेथे सरपंच जान्हवी साळुंखे, माजी सरपंच सावळाराम जाधव, आयुब तांबोळी, माधव गायकवाड, आयुब टिवले आणि प्रज्ञेश खेडकर यांची भाषणे झाली. सर्व वक्त्यांनी पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देत शहीद जवानासाठी एक निधी संकलित करून पाठवावा, असा निर्णय घेतला. कँडल मार्चमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नेरळ आणि परिसरातील ग्रामपंचायत सदस्य, कर्जत पं. स. सदस्यही कँडल मार्चमध्ये सहभागी झाले होते.

Check Also

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक

शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच होणार सुरुवात पनवेल ः रामप्रहर वृत्तमुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये …

Leave a Reply