स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

अलिबाग : प्रतिनिधी

प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. 547 प्रकल्पग्रस्तांना रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने नोकरीत समावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड प्रकल्पासाठी नागोठणे परिसरातील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या वेळी प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र 31 वर्षात केवळ 50 ते 60 प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले गेले. 547 प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित राहिले. आता हा प्रकल्प रिलायन्स पेट्रोकेमिकल्सने विकत घेतला आहे, मात्र प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न काही सुटलेला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याने वरवठणे ते चोळे परिसरातील स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

संघर्ष समितीच्या वतीने गंगाराम पारंगे, गोरखनाथ पारंगे आणि मनोज पारंगे हे उपोषणाला बसले आहेत. प्रकल्पग्रस्तांना कायम स्वरूपी नोकरीत सामावून घेतले जावे, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. मागणी मान्य होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदांसाठी भाजप महायुतीकडून पाच जणांचे अर्ज दाखल

युवा नेते परेश ठाकूर, डॉ. अरुणकुमार भगत, गणेश कडू, अ‍ॅड. प्रथमेश सोमण, दिनेश खानावकर यांचा …

Leave a Reply