Breaking News

नवी मुंबईतील गुन्हेगारीचा आलेख वाढला

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

2021 मध्ये नवी मुंबईतील गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. 2020 च्या तुलनेत गुन्ह्यांत 25 टक्के वाढ झाली असून गुन्हे उकल होण्याच्या प्रमाणातही 3 टक्के घट झाली आहे. मात्र टाळेबंदीत गुन्हे कमी झाल्याने ही वाढ दिसत असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोरोना टाळेबंदीकाळात गुन्हेगारी कमी होती. दरम्यान, कोरोनाकाळात कारागृहातील अनेक कच्च्या कैद्यांना सोडण्यात आले होते. ते परत गुन्हेगारीकडे वळल्याने गुन्हेसंख्या वाढली असल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे. पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिह यांनी बुधवारी 2020 व 2021 या वर्षांतील गुन्ह्यांची आकडेवारी सादर केली. यात 2020 मध्ये चार हजार 431 गुन्हे दाखल झाले होते. त्यातील दोन हजार 384 उकल झाले होते. मात्र 2021 मध्ये गुन्हेसंख्या वाढून पाच हजार 865 वर पोहोचली. यातील तीन हजार 366 गुन्हे उकल झाले. यातून गेल्या वर्षीच्या तुलनेत एक हजार 300 गुन्ह्यांची भर पडली आहे.

2021 मध्ये वाहतूक नियमांचे उलंघन करणार्‍या 1 लाख 32 हजार 561 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून 3 कोटी 30 लाख 23 हजार 50 दंड रक्कम वसूल करण्यात आला आहे. यात दोनपेक्षा अधिक वेळा नियम तोडणार्‍या 6 हजार 501 वाहनचालकांचा समावेश आहे. त्यांचा वाहन परवाना रद्द करण्याची शिफारस उपप्रादेशिक विभागाला करण्यात आली आहे.

सायबर गुन्हेगारीवर वचक, गुन्हे उकल आणि दोषसिद्धी प्रमाणात वाढ करणे ही आव्हाने आहेत. 2022 मध्ये यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय पार्किंग व्यवस्थेच्या नियोजनावर भर देण्यात येईल. -बिपिनकुमार सिंह, पोलीस आयुक्त

विशेष कामगिरी

  • वाहनचोरीतील एक कोटी 46 लाख 50 हजारांची 25 वाहने जप्त
  • बोलण्यात गुंगवून चोरीचे 17 गुन्हे उकल, सहा लाख 58 हजारांचे 173 ग्रॅमचे दागिने जप्त
  • खांदेश्वर पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक करून 17 गुन्ह्यांची उकल, तर वाहनचोरांना अटक करीत 9 दुचाकी जप्त
  • पनवेल तालुका अमली पदार्थ गुन्ह्यात सहा आरोपींकडून 2 कोटी 56 लाख 70 हजारांचा माल जप्त
  • पनवेल वाहनचोरीत आठ आरोपींकडून एक कोटी 70 लाख 52 हजारांच्या 35 चारचाकी जप्त
  • रबाळेत पाच आरोपींना अटक करीत एक कोटीचे एक किलो 965 ग्रॅमच्या चांदीच्या विटा जप्त
  • वाशी पोलीस ठाणेअंतर्गत सहा आरोपींकडून 79 लाख 14 हजार 880 रुपयांचा गुटखा जप्त
  • चार कोटी 34 लाखांचे अमली पदार्थ जप्त
  • अमली पदार्थ विरोधी पोलिसांनी 208 कारवाया करीत 460 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चार कोटी 34 लाख 72 हजार 532 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

सायबर गुन्हेगारीचे आव्हान

नवी मुंबई पोलिसांसमोर सायबर गुन्हेगारीचे मोठे आव्हान असल्याची कबुली या वेळी पोलीस आयुक्तांनी दिली. 2021 मध्ये 295 गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी 30 गुन्ह्यांची उकल झाली असून 26 लाख 96 हजार 685 रुपये तक्रारदारांना मिळवून देण्यात यश आले आहे. 2020 मध्ये 232 गुन्ह्यांची नोंद होत 21 गुन्हे उकल झाले होते.

पनवेल परिसरात वर्षभरात हत्येचे 18 गुन्हे उघडकीस

पनवेल : वार्ताहर

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मध्ये जानेवारी ते डिसेंबर 2021 या वर्षामध्ये हत्येचे 19 गुन्हे दाखल झाले. यापैकी 18 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील पनवेल शहर पोलीस ठाण्यातील एक हत्येचा गुन्हा उघडकीस आलेला नाही.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोन मध्ये पनवेल, खांदेश्वर, कामोठे, पनवेल तालुका, तळोजा, खारघर, कळंबोली, न्हावाशेवा, मोरा, उरण या दहा पोलीस ठाण्याचा समावेश होतो. हत्येच्या 19 गुनहयापैकी 18 गुन्हे उघडकिस आल्याने गुन्हा उघडकिस आणण्याचे प्रमाण 95 टक्के आहे. तर वर्षभरात या दहा पोलीस ठाण्यात मारहाणीचे एकूण 238 गुन्हे दाखल झाले. यापैकी 225 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसाना यश आले आहे. तर शासकीय नोकरांना दुखापत व मारहाणीचे 28 गुन्हे दाखल झाले. यापैकी सर्वच्या सर्व 28 गुन्हे उघडकीस आले. वर्षभरात गर्दीचे 69 गुन्हे दाखल करण्यात आले. यात सर्व 69 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

या आकडेवारीवरून दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यामध्ये परिमंडळ दोनमधील पोलिसांना यश येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Check Also

पनवेलमध्ये शुक्रवारपासून राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी

राज्यातून निवडलेल्या 25 उत्कृष्ट एकांकिका होणार सादर पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास …

Leave a Reply