Breaking News

‘सीकेटी’च्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र विधिमंडळाला भेट

दोन्ही सभागृहांच्या कामकाजाची जाणून घेतली माहिती

मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी

(दि. 20) महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास भेट दिली. या विद्यार्थ्यांनी भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विधिमंडळ सभागृहाच्या कामकाजाची राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून माहिती घेतली.

राज्य विधिमंडळाच्या विधीनिर्मिती प्रक्रियेबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी सीकेटी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील 47 विद्यार्थी आणि दोन प्राध्यापक यांच्या चमूने महाराष्ट्र विधिमंडळ सभागृहास भेट दिली.

महाविद्यालयीन विद्यार्थी विधिमंडळ परिसरात दाखल झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानी विद्यार्थ्यांनी काही वेळ विश्रांती व अल्पोपहार घेतल्यानंतर विधानभवनाच्या परिसरात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. सर्वप्रथम विधानसभा सभागहाचे कामकाज पाहण्यासाठी विद्यार्थी दाखल झाले. यानंतर विधान परिषदेकडे मार्गस्थ झाले.

दोन्ही सभागृहाचे कामकाज अनुभवल्यानंतर महाविद्यालयाच्या चमूस पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबोधित करून त्यांना देशाच्या राजकीय प्रक्रियेत सक्रीय सहभागी होऊन लोकशाही प्रक्रियेस यशस्वी करण्याबाबत भाष्य केले. याबरोबर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांच्या विद्यार्थीदशेतील अनुभव उद्धृत केले. यानंतर मंत्री महोदय आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या चमूसोबत मुक्त संवाद केला व अशा प्रकारच्या विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या सातत्यपूर्ण आयोजनाबाबत शुभेच्छा दिल्या.

या भेटीच्या आयोजनासाठी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. आकाश पाटील, प्रा. अपूर्वा ढगे यांनी विशेष परिश्रम घेतले. यासोबतच आयोजनातील महत्त्वपूर्ण तांत्रिक व प्रशासकीय बाबींच्या पूर्ततेसाठी विधानभवन हेड क्लार्क प्रवीण देवरे, उमेश पोद्दार यांचे विशेष सहकार्य लाभले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी राज्यशास्त्र विभागाचे कौतुक केले.

प्रत्यक्षण भेटीआधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी विधिमंडळाच्या कार्यवाहीबाबतचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी महाविद्यालयाचे आयक्युएसी समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव, परीक्षा नियंत्रक डॉ. एस. आय. उन्हाळे, भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. डी. एस. नारखेडे आदी उपस्थित होते.

अभ्यागतांसाठी सुसज्ज ऑडिटोरियमची मागणी

दरम्यान, या भेटीच्या अनुषंगाने विधिमंडळ इमारतीमध्ये अभ्यास दौर्‍यासाठी आलेल्या अभ्यागतांसाठी सुसज्ज ऑडिटोरियम तयार करण्याबाबत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली. राज्यातील ठिकठिकाणच्या शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, काही शिष्टमंडळे अभ्यास दौर्‍यांतर्गत येथे येतात. कुतुहलाने सर्व बघतात. अभ्यागतांना या वास्तूचे, येथील कार्यपद्धतीचे विस्तृत ज्ञान मिळावे, विधानसभा, विधान परिषदेतील कामकाज, अधिवेशन आणि लोकप्रतिनिधींचे कर्तव्य, अधिकार या सर्व बाब असलेली एक चित्रफीत, सादरीकरण त्यांना दाखविता येईल, असे सुसज्ज सभागृह असावे, अशी सूचनावजा मागणी या पत्रातून मंत्री मुनगंटीवार यांनी केली.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply