पनवेल ः रामप्रहर वृत्त
शिवसेनेसह महायुतीतील सर्व मित्रपक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी एकजुटीने जीवापाड मेहनत घेत आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांना पुन्हा एकदा आमदार करणारच, असे सांगून महायुतीचा धर्म पाळणार असल्याची ग्वाही शिवसेनेचे पनवेल शहरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी दिली.
काही प्रसंग घडले असतील. आमचे मित्र व अपक्ष उमेदवार यांना शुभेच्छा देण्यासाठी मी गेलो असलो तरी याचा अर्थ मी त्यांचा प्रचार करणार असा होत नाही. शिवसैनिक नेहमी पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा आदेश पाळत असतो. त्याचप्रमाणे माझ्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते महायुतीचा धर्म पाळून आमदार प्रशांत ठाकूर यांना पुन्हा एकदा विजयी करतील, अशी
निःसंदिग्ध ग्वाही प्रथमेश सोमण यांनी दिली.
दरम्यान, पनवेल शहर व ग्रामीण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. त्यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे जनता त्यांच्यावर खूश आहे. विजयाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. पनवेल शहरासह ग्रामीण भागातही महायुतीचे कार्यकर्ते जोरदार प्रचार करीत आहेत.