कर्जत : बातमीदार
तालुक्यातील ताडवाडी येथे आदिवासी महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्या रक्तबंबाळ झाल्या होत्या. पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली आहे, मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तसेच आरोपी यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार याला अटक करावी तसेच आदिवासींवरील अत्याचाराच्या उन्नती सामाजिक संस्थेकडून पोलीस उपविभागीय अधिकारी कर्जत यांच्या कार्यालयावर सोमवारी (दि. 28) मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
बिगर आदिवासी कृष्णकुमार ठाकूर यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून शेतकरी आदिवासी असल्याचा गैरफायदा घेत विवादित जागेवर काम सुरू केले. आपल्या जागेवर काम सुरू असल्याचे समजताच तुळसीबाई अनंता खंडवी व इतर आदिवासी महिला या काम थांबवायला गेल्या होत्या, मात्र तेथील मिळकतीचे मुख्य भोगवटादार कृष्णकुमार ठाकूर त्याचे कामगार अमोल पाटील, गणेश गोविंद घोडविंदे पाच सहकारी यांनी आदिवासी महिलावर जिवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्या महिला पूर्णपणे रक्तबंबाळ झाल्या होत्या. पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल होऊन अमोल पाटील व इतरांवर गुन्हे दाखल झाले, मात्र या घटनेचा मुख्य सूत्रधार कृष्ण कुमार ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही तसेच गुन्हेगार अद्याप मोकाट असल्याने पोलीस खात्याकडून त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप आदिवासी संघटनेने केला आहे. त्यामुळे या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आदिवासी ठाकूर उन्नती सामाजिक संस्थेकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्जत तालुक्यातील आदिवासी ठाकूर-कातकरी, महादेव कोळी तसेच समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन कर्जत तालुका आदिवासी संघटनेने केले आहे. हा मोर्चा सकाळी रॉयल गार्डन मुद्रे कर्जत येथून निघणार आहे.जो पर्यंत मागण्या मान्य होत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका संघटनेने घेतली असल्याचे अध्यक्ष भरत शीद यांनी केले आहे.