रायगडात पावसाची संततधार भातशेतीला पूरक

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून संततधार कायम आहे. सध्यातरी हा पाऊस भातशेतीला पूरक आहे, मात्र ऑक्टोबर महिन्यात असाच पाऊस राहिल्यास तो नुकसानदायक ठरू शकतो, असे मत कृषी विभागाने व्यक्त केले.
जिल्ह्यात जुन महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे लावण्या खोळंबल्या होत्या, पण जुलै महिन्यात पावसाने कसर भरून काढली. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला. ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी कडाकरपा आणि किड रोगांचा भातपिकावर प्रादुर्भाव झाला होता. कृषी विभागाने शेतकर्‍यांना सतर्कतेचा इशाराही दिला होता. पण सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला. जिल्ह्यात सलग 19 दिवस पावसाची संततधार सुरु राहिली आहे. त्यामुळे भातपिकावरील किडरोग प्रादुर्भाव आणि करपा रोग प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली आहे. हा पाऊस सध्यातरी शेतीस पुरक ठरला आहे.
जिल्ह्यात हळवे भातपीक सध्या फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गरवे पोटरी भरण्याच्या अवस्थेत आहे आणि निमगरवे भातपीक पोटरी ते फुलोर्‍याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे सध्यातरी सप्टेंबर महिन्यातील पावसाने भातपिकाला धोका निर्माण झालेला नाही, मात्र अतिवृष्टी झाल्यास भात खाचरातील पाणी पातळी कमी करणे गरजेचे असल्याचा सल्ला कृषी विभागाने शेतकर्‍यांना दिला आहे, तर पावसाने उघडीप दिल्यास नत्र खतांची तिसरी मात्रा आणि किडरोधक फवारण्या उरकण्याचेही कृषी विभागाकडून सूचित करण्यात आले आहे.

ऑगस्ट महिन्यात पावासाने ओढ दिल्याने भातपिकावर काही ठिकाणी किडरोग आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. या किडरोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सप्टेंबर महिन्यातील पाऊस उपयुक्त ठरला आहे. त्यामुळे भातपीक जोमाने वाढत आहे. पीक संरक्षणासाठी कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांना वेळोवेळी सल्ले दिले जात आहेत.
-डी. एस. काळभोर, कृषी उपसंचालक, रायगड

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply