ग्रामस्थांच्या तक्रारींमध्ये वाढ
म्हसळा : प्रतिनिधी
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेली म्हसळा तालुक्यातील तीन रस्त्यांची कामे (एकूण लांबी सुमारे 6.50 किमी) गेल्या गेल्या 3-4 वर्षांपासून ठप्प आहेत. त्याविषयीच्या ग्रामस्थांच्या तक्रारीत वाढ झाली आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसर्या टप्यामध्ये राज्यात 10 हजार किमी ची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार म्हसळा तालुक्यातील ढोरजे-कुडतोडी, श्रीवर्धन राज्य मार्ग ते जांभूळ बौद्धवाडी, पाभरे-चाफेवाडी-चिचोंडा हे सुमारे 11.805 कि.मी. लांबीचे रस्ते योग्य कालावधीत पूर्ण झाले आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेल्या म्हसळा तालुक्यातील सावर-चिरगाव-बौध्दवाडी (लांबी 2.500 किमी), पाष्टी-मोरवणे (लांबी दोन कि.मी), या रस्त्यांची कामे शासनाने 2018-19 मध्ये ठेकेदाराला दिली आहेत. मात्र ठेकेदाराने मागील तीन-चार वर्षात यापैकी कोणतेही काम सुरु केले नसल्याने ठेकेदार बदलण्याची मागणी पं.स. उपसभापती संदीप चाचले, सरपंच चंद्रकांत पवार, केतन आंग्रे यांच्यासह परिसरांतील ग्रामस्थ करीत आहेत.
तालुक्यातील घूम-रुदवट-पानवे या रस्त्याच्या ठेकदारावर टर्मीनेशनची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे, त्याच्या मंजुरीनंतर अन्य प्रस्ताव सादर केले जातील
-जसवंती आवारे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यालय, माणगाव