लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन; महात्मा फुले महाविद्यालयात पदवीदान समारंभ
पनवेल ः रामप्रहर वृृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शनिवारी (दि. 12) पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व विषद केले तसेच पदवी प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना आदर्श नागरिक म्हणून जीवन कसे जगता येईल यासाठी प्रयत्न करा व इतर गरजूंना मदतीचा हात द्या, असे आवाहन केले. कार्यक्रमास भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते महात्मा फुले महाविद्यालयातील पदवीधर व पदव्युत्तर स्नातकांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे देशाच्या विकासामध्ये असलेले योगदान व त्याग तसेच देश महासत्ता बनण्याची जी स्वप्ने पाहतो आहे त्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांनी केलेले कार्य किती महत्त्वाचे आहे याची आठवण करून दिली. शिक्षणातून मिळणार्या जीवनमूल्यांचा यथायोग्य वापर प्रत्यक्ष जीवनात करणे आवश्यक आहे. जीवनामध्ये येणार्या अडचणींवर मात करून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. 21व्या शतकातील आवाहने, जागतिकीकरण यासारख्या गोष्टींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे यासाठी त्यांनी सक्षम राहणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी उपस्थितांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एन. आर. मढवी, डॉ. आर. ए. पाटील, ए. जी. रोकडे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रफुल्ल वशेणीकर, प्रा. सोनू तन्वर व प्रा. प्रवीण गायकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ. पाटील यांनी मानले.