अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेचा (राजिप) कारभार सोमवारपासून (दि. 21) प्रशासकाच्या हाती गेला आहे. राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील हेच पराशासक आहेत. राजिपवर प्रशासक नेमण्याची ही तिसरी वेळ आहे. जिल्हा परिषद स्थापन होण्यापूर्वी जिल्हा लोकलबोर्ड होते. 1962 साली रायगड जिल्हा परिषद स्थापन झाली. केशवराव (दादासाहेब) लिमये हे रायगड जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष. 2022 पर्यंत 23 अध्यक्ष झाले. राजिपच्या 60 वर्षांच्या इतिहासात केवळ तीन वेळाच प्रशासक नेमण्यात आले. 1090 ते 1992 या कालावधीत राजिपवर पहिल्यांदा प्रशासक नेमला गेला. त्यानंतर 1996 साली प्रशासक होता. 2017 साली राजिपची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यावेळी 59 सदस्य निवडून आले होते. 20 मार्च 2022 रोजी त्यांचा कालवधी संपणार असल्याने मार्च 2022 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील असे वाटत होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केले. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे निवडणुका होतील असे वाटत होते. परंतु राज्यातील सर्व जिल्हा परिषदांवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळे राजिपचा कारभार प्रशासकच्या हाती गेला आहे. 21 मार्चपासून राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी राजिपचे प्रशासक म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदांचा कारभार प्रशासकच्या हाती गेल्यामुळे सर्वच जिल्हा परिषदांचा कारभार राज्य सरकारच्या हाती गेला आहे.