Breaking News

चिनी बनावटीचे 1200 ड्रोन जप्त

जेएनपीटीत पावणे पाच कोटींचा साठा हस्तगत

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
जेएनपीटी बंदरातून रक्तचंदनानंतर आता चिनी बनावटीच्या बंदी घालण्यात आलेल्या खेळण्यातील ड्रोनची तस्करी उघड झाली आहे. न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाच्या क्राइम इंटेलिजेन्स युनिटच्या अधिकार्‍यांनी इंधन पंपाच्या नावाने आयात करण्यात आलेल्या 1200 ड्रोनचा साठा एका 40 फुटी कंटेनरमधून ताब्यात घेतला आहे. तस्करी मार्गाने आयात या ड्रोनची किंमत सुमारे पाच कोटींच्या घरात आहे. याआधीही डीआरआयच्या विभागाने 36 ड्रोनचा साठा जप्त केला होता.
जेएनपीटी बंदरातून याआधी सोने, चांदी, शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ, सापांची कातडी यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात होती. त्यानंतर मागील काही वर्षांपासून आखाती देशात निर्यात होणार्‍या रक्तचंदनाच्या तस्करीला उधाण आले. त्यानंतर आता देशात बंदी घालण्यात आलेल्या चीनच्या ड्रोनच्या तस्करीला सुरुवात झाली आहे.
चीनमधून खेळणी आणि इंधन पंपाच्या नावाने हा ड्रोनचा साठा जेएनपीटी बंदरामार्गे एका एजन्सीमार्फत आयात करण्यात आला होता. खबर्‍याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रोनचा साठा जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या 1200 ड्रोनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत पावणे पाच कोटींच्या घरात आहे. याआधीही जेएनपीटी बंदरात चीनमधून आयात करण्यात आलेल्या 14.11 लाख किमतीचा 36 ड्रोनचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
देशातील ड्रोनच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्र सरकारने काही अपवादांसह परदेशी ड्रोनच्या आयातीवर बंदी घातली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत फॉरेन ट्रेड महासंचालनालयाने (डीजीएफटी) गेल्या महिन्यात परदेशी ड्रोनच्या आयातीवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली आहे.
देशात आयातीवर बंदी घालण्यात आलेल्या या चिनी बनावटीच्या ड्रोनची तस्करी करण्यासाठी तस्करांनी न्हावा शेवा असे सांकेतिक नाव दिले आहे. याच सांकेतिक नावाने या ड्रोनची तस्करी केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याचा अधिक तपास सुरू आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply