Breaking News

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कारभार; प्रवाशांना मनस्ताप

महाड ः प्रतिनिधी

सलग 3 दिवसांच्या सुट्ट्या आणि चवदारतळे वर्धापनदिनासाठी आलेले भीमअनुयायी यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर नातेखिंड येथे रविवारी (दि.20) सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ही वाहतूक कोंडी सुटू न शकल्यामुळे कोकणात व मुंबईत जाणार्‍या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.

चवदारतळे वर्धापनदिन, शिवजयंती आणि होळी आटोपून मुंबईत जाणारे चाकरमानी यांच्या वाहनांमुळे आणि पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या वाहतूक कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागले आहे.

महाड चवदारतळे वर्धापनदिनी लाखोंचा भिमसागर देशभरातून येत असतो. कोरोनाची दोन वर्षे प्रतिक्षेनंतर तिथीप्रमाणे आलेली शिवजयंती आणि होळीचा सण आटोपून कोकणातून चाकरमानी मुंबईत चालले आहेत. या गोष्टीची दखल पोलीस प्रशासनाने घेतली नसल्याने भिमसैनिक, शिवभक्त आणि चाकरमनी यांच्या वाहनांमुळे महाड येथील नातेखिंड येथे मुंबई गोवा महामार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडी झाली होती.

याच चौकातून एक मार्ग किल्ले रायगडकडे तर दुसरा मार्ग चवदार तळ्याकडे जातो. याच ठिकाणी निर्माण होत असलेल्या उड्डाणपुलाखाली अनेक टपरीवाले आणि भाजी वाल्यांची अनाधिकृत दुकाने वसवली आहेत. ही दुकाने पोलिसांनी हटवणे गरजेचे होते.

महामार्गाचेही काम बंद ठेऊन रविवारी एका दिवसासाठी अवजड वाहनांना महामार्गावर बंदी घालायला हवी होती. मात्र पोलीस प्रशासन यात फेल ठरल्याचे बोलले जात आहे.

 नियोजन नसल्याचा फटका पर्यटकांना

योग्य नियोजनाअभावी रविवारी सुमारे 12 तास वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही बाजूने दहा किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे भिमसैनिक, शिवभक्त आणि चाकरमन्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply