तालुक्यातील 24 गावे, 36 वाड्या तहानलेल्या
माणगाव : प्रतिनिधी
मार्च महिन्या अखेरपासूनच माणगाव तालुक्यातील गावांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. वर्षानुवर्षे पाणीपुरवठा कृती आराखड्यात येणारी ही गावे पाणीटंचाईपासून मुक्त कधी होणार? असा प्रश्न नागरिकातून उपस्थित केला जात आहे.
या वर्षी माणगाव तालुक्यातील 24 गावे व 36 वाड्यातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मार्च अखेरपासूनच काही गावातील रहिवाशांची पाण्यासाठी पायपीट सुरु झाली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावू लागल्याने तालुक्यातील काही गावातील पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
माणगाव तालुक्यातील सुरव तर्फे तळे, आमडोशी, चाच, बामणगाव, पळसफ मूळगाव, घोडेघुर्म, मालुस्ते, जोर, केळगण, मांजुरणे, जांभूळमाळ, हरवंडी कोंड, कुंभार्ते, बोरमाळ, उमरोली, वडाचा कोंड, कविळवहाळ बुद्रुक, कविळवहाळ खुर्द, कविळवहाळ कोंड, उमरोली/ दिवाळी, मांजरवणे, मुठवली तर्फे तळे, उसर बुद्रुक, उसरर्कोंड ही 24 गावे तर खरवली बौध्दवाडी, देगाव आदिवासीवाडी, पळसगाव खुर्द धनगरवाडी, कोंडेथर, हुंबरी धनगरवाडी, मशीद्वाडी, मशीद्वाडी बौध्दवाडी, कातळवाडी, उधळेकोंड, सोनारवाडी, वडाचीवाडी, पळसगाव बुद्रुक धनगरवाडी, विहुलेकोंड, सागी आदिवासीवाडी, महादपोली आदिवासीवाडी, कुंभेवाडी, कामतवाडी, मोरेवाडी, वडाची वाडी, खर्डी बुद्रुक आदिवासीवाडी, चांदे आदिवासीवाडी, कुम्भार्ते आदिवासीवाडी, कावडेवाडी, फणसवाडी, बागवाडी, कोस्ते बुद्रुक आदिवासीवाडी, गौळवाडी, निळज आदिवासी वाडी, उमरोली तर्फे दिवाळी बौध्दवाडी, आदिवासी वाडी, उमरोली तर्फे दिवाळी आदिवासी वाडी, उसर बुद्रुक बौध्दवाडी, रोहिदासवाडी, पळसगाव खुर्द आदिवासी वाडी, पळसगाव खुर्द धनगरवाडी, तळेगाव/गोरेगाव आदिवासी वाडी या 36 वाड्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईला सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाणीटंचाई ही त्यांच्या कायमच नशिबी राहिली आहे.
शासनाच्या पाणीपुरवठा कृती आराखड्यात या गावांचा समावेश वर्षानुवर्षे करण्यात येत आहे. मात्र कायमस्वरूपी पाणीपूरवठा योजना या गावांना अद्याप देण्यात आल्या नाहीत. या गावांना दरवर्षी साधारण एप्रिल महिन्यापासून टॅकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच काही वाड्यात रस्ता नसल्याने बैलगाडीने पाणीपुरवठा केला जातो. माणगाव पंचायत समिती कार्यालयाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाणीटंचाई निवारणासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखली जात आहे.
माणगाव तालुक्यातील 24 गावे व 36 वाड्यांना पाणीटंचाई भासेल असे गृहित धरून पाणीपुरवठा कृती आराखडा तयार करण्यात आला असला तरी मे महिन्याअखेरपर्यंत या व्यतिरिक्त अनेक गावांना पाणीटंचाईशी सामना करावा लागणार आहे.