अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी
अलिबाग : प्रतिनिधी
तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत हद्दीत वहिवाटीच्या रस्त्यात असलेले अनधिकृत बांधकाम हटवावे, या मागणीसाठी खंडाळा ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार (दि. 23)पासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायत हद्दीत प्राथमिक शाळा ते पाचकळशी आळीपर्यत रस्ता गेला आहे. या रस्त्याच्या टोकापासून ग्रामस्थांची शेती आहे. पूर्वापार या रस्त्याचा वापर शेतकरी हे शेतात जाण्यासाठी करीत आहेत. या रस्त्याच्या शेवटच्या टोकाला विनायक म्हात्रे याची 334 गट नंबरची मालकी आहे. म्हात्रे यांनी शेतावर जाणार्या रस्त्यावर अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे शेतकर्यांना शेतात जाण्यासाठी अडचणी येत आहेत. याबाबत वैभव म्हात्रे यांनी खंडाळे ग्रामपंचायत आणि अलिबाग तहसीलदार यांच्याकडे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी अर्ज केला होता.
अलिबाग पंचायत समितीनेही विनायक म्हात्रे यांना अनधिकृत बांधकाम काढण्याबाबत नोटीस दिली होती, मात्र अद्यापही म्हात्रे यांनी हे बांधकाम काढलेले नाही. त्यानंतर पुन्हा वैभव म्हात्रे यांनी तहसीलदारांना भेटून कारवाई झाली नसल्याचे सांगितले. तहसीलदारांनी 7 जानेवारी 2022 रोजी ग्रामसेवक खंडाळे यांना नोटीस देऊन तात्काळ कारवाई करून अहवाल कार्यालयास सादर करावा, असे कळविले आहे. मात्र ग्रामसेवकाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे खंडाळा ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.