दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेलच्या खेळीने विजयाला गवसणी
नवी मुंबई ः प्रतिनिधी
आयपीएलच्या 15 व्या हंगामात बंगळुरूच्या गोलंदाजांनी केलेली जादू तसेच फलंदाजांनी संयम राखून केलेली फलंदाजी यामुळे बंगळुरूने कोलकातावर तीन गडी राखून मात केली. कोलकाताने दिलेले 129 धावांचे लक्ष्य सहज गाठता येईल असे वाटत असले तरी या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूची चांगलीच दमछाक झाली, मात्र शेवटी विजय संपादन करीत बंगळुरुने या हंगामातील पहिला विजय नोंदवला.
सलामीचे फलंदाज फाफ डू प्लेलिस (5), अनुज रावत (0) बाद झाल्यामुळे सर्व जबाबदारी विराटवर येऊन पडली. मात्र विराटही उमेशने टाकलेल्या चेंडूवर अवघ्या 12 धावांवर बाद झाला. कोहली बाद झाल्यानंतर मात्र 129 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी बंगळुरूला मोठी कसरत करावी लागली. डेविड वेली (18), रुदरफोर्ड (28) शाहबाज अहमद (27) यांनी संघाला चांगल्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र रुदरफोर्ड बाद झाल्यानंतर सामना पूर्णपणे फिरला.
बंगळुरूच्या हातातून सामना जातो की काय, अशी परिस्थिती असताना दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल यांनी जबाबदारीने खेळत शेवटच्या क्षणी अनुक्रमे 14 आणि 10 धावा केल्या. त्यामुळे बंगळुरूला या हंगामातील पहिला विजय मिळवता आला. आकाश दीपने चार षटकांत 45 धावा देत तीन विकेट घेतल्या. त्यामुळे कोलकाताचा पूर्ण संघ अवघ्या 128 धावांवर बाद झाला.