Breaking News

आमदार जयंत पाटील यांच्यावर कारवाई करा ; रायगडातील पत्रकारांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी

अलिबाग ः प्रतिनिधी

अलिबाग येथील ‘लोकसत्ता’चे पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण करणारे शेकापचे आमदार जयंत पाटील व आमदार पंडित पाटील यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांकडून सोमवारी (दि. 27) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसून शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील तसेच त्यांच्या इतर साथीदारांनी अलिबाग येथील ‘लोकसत्ता’चे पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण केली होती. याचा निषेध या मोर्चात करण्यात आला. रायगडातील सर्व पत्रकार संघटनांचे  पदाधिकरी, सदस्य मोर्चात सहभागी झाले होते.

सकाळी 11.30 वाजता पत्रकार भवन येथून मोर्चाला सुरुवात झाली. अत्यंत शिस्तबध्दपणे हा मोर्चा पोस्ट ऑफिस-काँग्रेस भवन-स्टेट बँक-कोएसो शाळा-न्यायालय-पोलीस ठाणे यामार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयस्थळी पोहचला.  हिराकोट तलाव येथे हा मोर्चा पोलिसांनी अडवला. त्यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी हे निवेदन स्वीकारले.

निवडणूक आयोगाची परवानगी नसतानाही मतमोजणी केंद्रात बेकायदा प्रवेश केल्याबद्दल आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील तसेच त्यांच्या इतर साथीदारांवर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपण स्वतः गुन्हा दाखल करावा, मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली नसताना मतमोजणी केंद्रात घुसून अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आमदार जयंत पाटील व पंडित पाटील यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, या प्रकरणाची जलद गतीने चौकशी करावी, आरोपपत्र तयार करून लवकरात लवकर न्यायालयात खटला दाखल करावा, पत्रकारावर हल्ला केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदवावा, सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज मिळावे, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply