Breaking News

पनवेल, उरण, चौककरांना गुढीपाडव्याची विकासभेट

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या पनवेलमध्ये

– 7700 कोटींच्या एक्स्प्रेस वे विकासकामांचे होणार लोकार्पण आणि भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल व उरण तालुक्यातील 7700 कोटी रुपयांच्या एक्स्प्रेस वे विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन रविवारी (दि. 3) सायंकाळी 5 वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ चिंचपाडा गाव येथे हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, खासदार कुमार केतकर, खासदार राजन विचारे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रविशेठ पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार जयंत पाटील, आमदार अनिकेत तटकरे, आमदार बाळाराम पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. पनवेल व उरण तालुक्यातील जनतेला उत्कृष्ट आणि जागतिक दर्जाचा रस्ता मिळावा यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जेएनपीटी उरण ते पनवेल रस्त्याची मागणी व पाठपुरावा केला होता. त्यानुसार 3500 कोटी रुपयांचा जेएनपीटी पोर्ट रोड पूर्ण झाला असून त्याचे लोकार्पण होणार आहे. कळंबोली येथील जंक्शनच्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने 800 कोटी रुपयांचा कळंबोली जंक्शन विस्तारीकरण प्रकल्प होणार असून त्याचे भूमिपूजन होणार आहे तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराचे भूमिपूजन होणार आहे. त्याचबरोबर उरण-जेएनपीटी-चौक या तीन हजार कोटी रुपयांच्या नवीन महामार्गाची घोषणा या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत. पनवेल, उरण आणि चौक परिसराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची विकासकामे होणार आहेत. त्यामुळे इंधन व वेळेची बचत, वाहतूक कोंडी आणि अपघातापासून मुक्ती, सहज आणि सोपा प्रवास तसेच उद्योगधंदे व व्यापाराला चालना मिळणार आहे.

इंदापूर येथेही भूमिपूजन, लोकार्पण सोहळा

माणगाव, रोहा ः प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील कासू ते इंदापूरदरम्यानचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन तसेच पुणे ताम्हाणी घाटमार्गे निजामपूरहून माणगाव ते दिघी रस्ता आणि इंदापूर ते तळेमार्गे भालेगाव आगरदांडा रस्ता या दोन कामांचे लोकार्पण केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी (दि. 3) दुपारी 3.30 वाजता माणगाव तालुक्यातील इंदापूर विघवली येथे होणार आहे. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत रायगडचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण असणार आहेत. त्यांच्या स्वागताची भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील व माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी दिली. दरम्यान, कोकणाला दिलेल्या या विकासकामांच्या भेटीबद्दल खासदार सुनील तटकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन ना. गडकरी आणि केंद्र सरकारचे आभार मानले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply