नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय संघ 2019च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला. सुमार फलंदाजीचा भारतीय संघाला फटका बसला. त्यामुळे तिसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले. या सामन्यानंतर या स्पर्धेबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या, पण आता बर्याच काळाने पुन्हा विश्वचषक स्पर्धा चर्चेत आली आहे. मला 2019ची विश्वचषक स्पर्धा खेळायची होती, पण निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने त्याबाबत माझ्याशी काहीच चर्चा केली नाही, असा गौप्यस्फोट भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगने केला.
मला 2019मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत खेळायची इच्छा होती. मी आवश्यक असणारी यो-यो टेस्ट पास केली होती, तसेच माझी 2017पासूनची कामगिरीदेखील उत्तम होती, पण संघ व्यवस्थापनाने माझ्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. इतकेच नव्हे तर माझ्या क्रिकेटमधील शेवटच्या टप्प्यात म्हणजेच निवृत्तीच्या आधीच्या काही काळातदेखील कोणीच माझ्याशी फारशी चर्चा केली नाही, असा खुलासा युवराजने केला.
2019च्या विश्वचषकाच्या वेळी मी 37 वर्षांचा होतो. त्या वेळी अनेक गोष्टी माझ्या विरोधात घडल्या. 2015च्या विश्वचषकातही मला संधी मिळाली नव्हती. त्या कालावधीत मी रणजी क्रिकेटमध्ये भरपूर धावा करीत होतो, तरीही मला नाकारले गेले याचे मला जास्त वाईट वाटले. अशा खूप घटना घडल्या, ज्या मला शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. त्या वेळी मी असे ठरवले की विश्वचषक स्पर्धा गमवावी लागली या असमाधानापेक्षा जे क्रिकेट मी खेळलो ते खूप छान होते याबाबत समाधान मानावे आणि निवृत्त व्हावे. त्यामुळे मी योग्य वेळी निवृत्त झालो याचा मला आनंद आहे, असेही युवराजने म्हटले आहे.