Breaking News

मुंबईत नव्या विषाणूचा रुग्ण

दक्षिण आफ्रिकेचा नागरिक; चिंता वाढली

मुंबई ः प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या नगण्य झाल्याने निर्धास्त असणार्‍या आरोग्य विभागाची चिंता ब्रिटनमध्ये आढळलेल्या ‘एक्सई’ या कोरोनाच्या नव्या उपप्रकाराने बाधित असलेला एक रुग्ण मुंबईत आढळल्याने वाढली आहे. मुंबई पालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये हे निदर्शनास आले आहे. भारतातील हा एक्सईचा पहिलाच रुग्ण आहे.

ही महिला रुग्ण 2 मार्चला कोरोनाबाधित होता. तिला कोणतीही लक्षणे नव्हती. दुसर्‍याच दिवशी म्हणजे 3 मार्चला कोरोनामुक्तही झाली. ही महिला वेशभूषाकार असून चित्रीकरणाच्या समुहामध्ये सहभागी असते. ही महिला फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेहून भारतात आली होती. त्यावेळी तिला करोनाची बाधा झालेली नव्हती, परंतु चित्रीकरणामध्ये नियमितपणे केल्या जाणार्‍या चाचण्यांमध्ये 2 मार्चला ती बाधित आढळली. तिचे नमुने चाचणीसाठी पाठविले असता एक्सईची बाधा झाल्याचे आढळले आहे. 3 मार्चचला दिलेल्या नमुन्यामध्ये ही महिला करोनामुक्त झाल्याचेही आढळले आहे. या महिलेने लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या होत्या आणि ती लक्षणे विरहित होती.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या अकराव्या चाचणी तुकडीचा भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण 376 रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील 230 रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. यात ‘ओमायक्रॉन’ चे 228 अर्थात आढळले आहेत. उरलेल्या दोन बाधितांपैकी एक जण ‘कापा’ उपप्रकाराने तर अन्य एक जण ‘एक्सई’ उपप्रकाराने बाधित होता, असे निष्पन्न झाले आहे.

ब्रिटनमध्ये एक्सई हा विषाणूचा उपप्रकार जानेवारीमध्ये आढळला आहे. जगभरात या विषाणूचे 600 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. हा विषाणू ओमायक्रॉनचे बीए.1 आणि बीए.1 या उपप्रकाराचे उत्परिवर्तन होऊन निर्माण झाला आहे. यामध्ये बीए.1 आणि बीए.2 जनुकीय घटकांचे मिश्रिण झाल्याचे आढळले आहे. बीए.1 आणि बीए.2 हे दोन्ही उपप्रकार देशभरात करोनाच्या तिसर्‍या लाटेपासून आढळत आहेत. त्यामुळे यांचेच गुणधर्म असलेल्या नव्या विषाणूपासून सध्या कोणताही धोका आहे, असे वाटत नाही. तिसर्‍या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या बाधित झाल्यामुळे करोनाविरोधात नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने तरी भारताला विषाणूच्या नव्या प्रकाराचा धोका नाही, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply