कोविड काळातील रक्त-प्लाझ्मादान शिबिराबद्दल सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून (एनएसएस) गतवर्षी कोरोना काळात आयोजित केलेल्या रक्त व प्लाझ्मादान शिबिराचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी
(दि. 7) गौरव केला. राज्यपालांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह तथा पदक देऊन सीकेटी महाविद्यालयाला सन्मानित करण्यात आले.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांचे स्मरण म्हणून दरवर्षी 23 मार्चला शहीद दिन पाळला जातो. यानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट अॅण्ड अॅक्टिव्हिस्ट्स व महाराष्ट्र इंटरपूनर चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने संवेदना मोहिमेंतर्गत संपूर्ण राज्य व देशात रक्त-प्लाझ्मादान शिबिर आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील राज्यपातळीवरील शिबिर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सहकार्याने सीकेटी महाविद्यालयाने आयोजिले होते. याची नोंद घेण्यात आली आहे.
मुंबईतील राजभवनात झालेल्या कार्यक्रमात ‘सीकेटी’चे एनएसएस विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे यांनी महाविद्यालयाच्या वतीने सन्मान स्वीकारला. रक्त-प्लाझ्मादान शिबिरात महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. योजना मुनीव, प्रा. सत्यजीत कांबळे, प्रा. सागर येरनार, प्रा. अपूर्वा ढगे, प्रा. आकाश पाटील तसेच शिक्षक कर्मचारी यांनीही विशेष परिश्रम घेतले होते.
याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. के. पाटील यांनी एनएसएस विभागाचे कौतुक केले.