Breaking News

खालापुरात कारखान्यांकडून नियमांचे उल्लंघन ः मनीष खवळे

खोपोली ः प्रतिनिधी

तालुक्यातील कंपन्या व मोठ्या उद्योगात स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, ही अपेक्षा फोल ठरली आहे. उलट कंपन्यांकडून सुरू असलेल्या प्रदूषणामुळे येथील लोकांचे आरोग्य धोक्यात आले. दुसरीकडे वर्तमान स्थितीत कंपन्यांकडून विस्तारासाठी खुलेआम नियमबाह्य बांधकामे, सर्रासपणे वृक्षतोड, डोंगर तोडून माती उत्खनन सुरू आहे.

यासंदर्भात आपण संबंधित सर्व शासकीय अधिकारी व प्रशासकीय विभागांना माहिती दिली व मागील एक वर्षापासून कारवाईबाबत पाठपुरावा करीत आहोत, मात्र आढावा घेण्याचे काम सुरू आहे. चुकीचे काम करणार्‍या कंपन्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, एवढेच उत्तर मिळत असून  दोषी कंपन्यांवर प्रत्यक्ष कारवाई कधी होणार, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते मनीष खवळे यांनी खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

मनीष खवळे यांनी खालापुरातील कंपन्यांची मनमानी, होणारे प्रदूषण, विनापरवाना वाढीव बांधकामे, कंपनी विस्तार याबाबत विभागीय अधिकारी शीतल परदेशी यांच्याकडे सहा महिन्यांपूर्वी सविस्तर तक्रार केली. तेव्हा दखल घेत परदेशी यांनी पाहणी दौराही केला व त्यानंतर या प्रकरणी खालापूर तहसीलदारांना चौकशी करून कारवाई अहवाल देण्याचे आदेशही दिले आहेत, मात्र आजतागायत एकाही कंपनीवर कोणतीही कारवाई झालेली नाही. नियमानुसार औद्योगिक क्षेत्रात व कंपनी क्षेत्रात 33 टक्के जागा ग्रीन झोन म्हणून राखीव ठेवण्याची शासन अट आहे, मात्र तालुक्यातील अनेक कंपन्यांत ग्रीन झोनच नाही, तर अनेक कंपन्यांनी असलेल्या ग्रीन झोनमधील वृक्ष तोडून विस्तार करून ग्रीन झोन नष्ट केला आहे. अनेक कंपन्यांनी कोणतीही परवानगी न घेता वाढीव बांधकामे, अतिरिक्त उत्पादन प्लांट निर्माण केले आहेत. याबाबतही महसूल विभाग, रायगड प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply