तब्बल तीन तासांनी वाहतूक पूर्ववत; प्रवाशांचे हाल
पनवेल ः वार्ताहर
पहाटेच्या वेळी पनवेल येथून सुटणार्या रेल्वे अचानकपणे बंद पडल्याने नोकरी, व्यवसायानिमित्त नवी मुंबई, मुंबई व ठाणे परिसरात जाणार्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले होते.
मंगळवारी (दि. 12) मध्यरात्रीच्या सुमारास काही समाजकंटकांनी पोल नं. 48 येथील सिग्नलच्या वायर्स व लोकेशन बॉक्स तोडून ठेवले होते. त्यामुळे बुधवारी (दि. 13)पहाटेची 4 वाजताची पहिली गाडी वेेळेत सुटली नाही. त्यानंतर रेल्वे प्रशासनाला हे समजताच त्यांची धावपळ सुरू झाली, परंतु त्या वेळेपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रवासी रेल्वे स्थानकात जमा झाले होते. पनवेल रेल्वे पोलीस, एसआरपीएफ, पनवेल शहर पोलिसांची पथके त्या ठिकाणी उपस्थित झाली व त्यांनी या घटनेची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाला दिली. तातडीने अधिकारी व कर्मचार्यांचे घटनास्थळी येऊन त्यांनी ही सेवा सुरळीत केली.
साधारण सकाळी 7.15 च्या दरम्यान ही वाहतूक पुन्हा सुरू झाल्याचे समजते, परंतु सकाळच्या वेळी चाकरमानी मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकात जमले होते. या वेळी जादा एसटी बस सेवा त्या ठिकाणावरून सोडण्यात आल्याने गर्दीवरील ताण कमी झाला होता. त्या काळामध्ये केवळ खारघर ते बेलापूर अशी वाहतूक सुरू होती.
ही घटना रात्रीच्या वेळेस घडली. त्यावेळी कुठल्याही रेल्वे धावत नव्हत्या. 4 ते 5 वर्षामध्ये ही प्रथमच घटना असून ह्या घटेनेचे गांभीर्य समजताच रेल्वेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी तातडीने त्या ठिकाणी जावून दुरुस्तीचे काम करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता या मार्गावरील रेल्वे उशिराने धावत आहेत.
-शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे