Breaking News

’लालपरी’ पूर्वपदावर!

16 हजार एसटी कर्मचार्‍यांवर कारवाई होणार?

मुंबई : रामप्रहर वृत्त

विलीनीकरणाच्या मुख्य मागणीसह इतर काही मागण्यांसाठी  गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलनाचे हत्यार उपसलेले एसटी कर्मचारी अखेर सेवेत रूजू झाले आहेत. त्यामुळे सामान्यांची जीवनवाहिनी असलेली एसटी पुन्हा एकदा रस्त्यांवर धावू लागली आहे. एसटीच्या पटावरील एकूण 82,263 कर्मचार्‍यांपैकी 76,962 कर्मचारी गुरुवारपर्यंत कामावर परतले आहेत. 11 हजार कर्मचारी अद्याप बडतर्फ आहेत. संपापूर्वी एसटीच्या सेवेत एकूण 92,266 कर्मचारी होते.

दीर्घ प्रतीक्षेनंतर मोठ्या प्रमाणावर बसफेर्‍या सुरू झाल्याचे दिलासादायक चित्र दिसू लागले. ग्रामीण भागाला मोठा आधार मिळू लागला आहे. बुधवारी महामंडळाने राज्यात 29 हजार फेर्‍या चालवल्या. यातून 17.78 लाख प्रवाशांची वाहतूक करत 11 कोटींचे उत्पन्न मिळवले, अशी माहिती महामंडळाने दिली. विलीनीकरण, वेतनवाढीसह अनेक मागण्यांसाठी 25 ऑक्टोबर 2021 पासून कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते.

संपकरी कर्मचारी कामावर परतत असल्याने सेवा पूर्वपदावर येण्याची आशा आहे. मात्र, एसटी महामंडळातील पाच हजारांहून अधिक बसची स्थिती भंगारसदृश्य झाल्याने आता प्रवासी वाहतुकीसाठी खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. बेस्टच्या धर्तीवर एसटी महामंडळ करारानुसार खासगी बस चालवणार आहे. या बससाठी 47 रुपये प्रतिकिमी असा मोबदला महामंडळ देणार आहे.

लातूर, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी या विभागात खासगी गाड्यांसाठी एका ट्रॅव्हल्सची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 500 गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. सध्या 320 गाड्यांपैकी 220 गाड्यांचे कंत्राट ’साई गणेश’ला देण्यात आले. 180 गाड्यांसाठीही ही ट्रॅव्हल कंपनी प्रयत्नात आहे. लातूर, धुळे, कोल्हापूर व रायगड/ रत्नागिरी विभागांमध्ये साध्या बसची उणीव भासत आहे. या भागातील अन्य फेर्‍यांना मागणी वाढत आहे. अशातच प्रवाशांकडून साधी एसटी सुरू करण्याची मागणी होत असल्याने भाडेतत्त्वावरील गाड्या या विभागात प्राथमिकतेने सुरू करण्यात येणार आहेत. दरम्यान पटावरील 82,263 पैकी 76,962 कर्मचारी कामावर परतले आहेत.

एकूण अकरा हजार कर्मचारी

बडतर्फ उच्च न्यायालयाने सर्व संपकरी कर्मचार्‍यांना कामावर हजर राहण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत दिली होती. अद्याप 16 हजार संपकरी कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. यातील 11 हजार कर्मचारी बडतर्फ आहेत. यामुळे त्यांच्यावरील बडतर्फीची कारवाई कायम राहणार की त्यांना मुदतवाढ मिळणार, यावर निर्णय अपेक्षीत आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply