आ. प्रशांत ठाकूर नेतृत्व करणार; वेगवेगळी कारणे सांगून नागरिकांची बोळवण
पनवेल : प्रतिनिधी
पाणी प्रश्नासंदर्भात झोपलेल्या सिडकोला जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार ( दि. 25 ) रोजी ’ मडका फोड ’ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक मनोज भुजबळ यांनी केले आहे.
नवीन पनवे मध्ये दोन महिन्यापासून अनियमित कमी दाबाने व खंडित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत सिडकोकडे विचारणा केली असता प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. पाईप लाईन लिकेज आहे, मोटर बिघडली आहे. टाटा कंपनीने पाणी सोडले नाही. लाईटची केबल तुटली आहे अशी कारणे सांगितली जातात. या सर्व समस्या सिडकोच्या असताना त्यासाठी रहिवाश्यांना वेठीस धरले जात आहे. नवीन पनवेल मधील सेक्टर 12, 15 ए व 1 मधील ओव्हर हेड पाण्याच्या टाक्या सिडकोने पाडल्या आहेत. त्या नवीन बांधण्याचे आश्वासन देऊन ही अद्याप बांधल्या नाहीत. सिडकोने आपल्या मालकीचे मोर्बे धरण नवी मुंबई महापालिकेला देऊन पनवेलकरांच फसवणूक केली आहे. त्यातच सिडको नवीन पनवेल मध्ये भूखंडांचे टेंडर काढून बिल्डरनां मोठ्या किमतीला विकत आहे. या बांधकामांसाठी त्यांना व्यावसायिक दराने पाणी पुरवठा केला जातो.
नागरिकांना सहभागाचे आवाहन
सिडकोकडून रहिवाश्यांना पाणी दिले जात नाही त्यामुळे सिडको व सोमवार 25 एप्रिल रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नवीन पनवेल मधील सर्व नगरसेवक व रहिवाशी धडक देऊन ‘मडका फोड’ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी सोमवारी सकाळी 9.30 वाजता नवीन पनवेल येथील अग्निशमन केंद्राजवळ जमावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक मनोज भुजबळ यांनी केले आहे.