Breaking News

राज्यातील स्थिती सामान्यांसाठी भयावह -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई ः प्रतिनिधी

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात अराजकता माजली आहे. पोलिसांसमोर एखाद्यावर हल्ला होत असेल तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असून राज्यातील परिस्थिती पाहिल्यानंतर सामन्य माणसांसाठी ही स्थिती भयावह आहे, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भेटायला खार पोलीस ठाण्यामध्ये गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवर जमावाने दगडफेक केली. यात किरीट सोमय्या किरकोळ जखमी झाले आहेत तसेच यावेळी सोमय्यांच्या गाडीचा पाठलाग करीत चप्पलाही फेकल्या. या प्रकरणी प्रसार माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कालची गोष्ट मुंबई पोलिसांच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण झेड दर्जाची सुरक्षा असलेले किरीट सोमय्या अधिकृतपणे कळवून पोलीस ठाण्यात आले होते आणि बाहेरील लोक हल्ला करण्यासाठी जमल्याचे त्यांनी सांगितले होते. हे सांगितल्यानंतरही हा हल्ला होतो याचा अर्थ एकतर हल्ल्याला पोलिसांचे समर्थन आहे किंवा पोलीस अयशस्वी झाले आहेत. झेड दर्जाची सुरक्षा असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत हलगर्जीपणा झालेला आहे. त्यामुळे पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे हा माझा आग्रह आहे. अन्यथा उद्या कोणीही सुरक्षित राहणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात झुंडशाही!

पोलिसांसमोर दगड मारला जात आहे आणि गुन्हा दाखल करायला त्यांना भीती वाटते. अशा प्रकारे झुंडशाहीचे राज्य यापूर्वी महाराष्ट्रात पाहिले नव्हते. पण आम्ही घाबरत नाही. जशास तसे उत्तर देऊ शकतो, असेही फडणवीस या वेळी म्हणाले.

Check Also

पनवेलमधील शेडुंग येथे अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत पनवेल तालुक्यातील शेडुंग …

Leave a Reply