नवी मुंबई ः बातमीदार
नैना क्षेत्रासाठी विकास नियंत्रण नियमावली व विकास आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाच्या नियमावलीतील टीडीआरमध्ये सुधारणार करण्याची मागणी नैना बिल्डर वेल्फेअर असोसिएशन व विकसक प्रकाश बाविस्कर यांनी अधिकार्यांकडे केली आहे.
प्रारूप विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली प्रसिद्ध होऊन जवळपास पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत. जमीनमालकाने उपरोक्त नोटीफिकेशन प्रसिद्ध झाल्यापासून अनुक्रमे पाच वर्षांच्या आत जमीन भूसंपादनाच्या मोबदल्यात टीडीआर मिळणेसाठी अर्ज सादर केल्यास त्यास 20, 15, 10 आणि 5 टक्के इन्सेटिव्ह टीडीआर मिळेल, अशी तरतूद नियमावलीमध्ये होती. या नियमाप्रमाणे ज्यांनी अर्ज पूर्वीच सादर केलेले आहेत. त्या अर्जावर नैनाकडून अद्याप कार्यवाही झालेली नाही. नवीन नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्याच्या पूर्वीची सादर झालेली प्रकरणे निकाली काढण्याच्या अनुषंगाने नोटिफिकेशनमध्ये सुस्पष्ट सुधारणा व्हाव्यात, अशी मागणी केली आहे.
नैना क्षेत्राच्या मंजूर विकास नियंत्रण नियामावलीतील टिडीआरच्या तरतूदीत सुधारणा करण्याबाबत सूचना व हरकती मागविण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली होती. या अनुषंगाने नैना बिल्डर वेल्फेअर असोसिएशनचे प्रकाश बाविस्कर यांना याबाबतच्या सुनावणीसाठी नैना -सिडको महामंडळाकडून निमंत्रित करण्यात आले होते. 2 मार्च 2022 रोजीच्या अधिसूचनेतील सुधारणांवरील सूचना, हरकतींच्या अनुषंगाने मंगळवारी (दि. 26) सिडको यांच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. नैना बिल्डर वेल्फेअर असोसिएशन व प्रकाश बाविस्कर यांनी टिडीआरच्या तरतूदीबद्दल विहीत कालावधीत त्यांच्या सूचना, हरकती नैना-सिडको यांचेकडे दिलेल्या आहेत. या अर्जावर कारवाई करणेबाबत स्पष्टता करावी, अशी मागणी प्रकाश बाविस्कर यांनी केली. या वेळी वरिष्ठ विधी सल्लागार अॅड. प्राचाली पाटील, वास्तुविशारद व नगररचनाकार भाग्यश्री गपट-पाटील यांनी आपले म्हणणे सादर केले. नैना-सिडकोच्या वतीने मुख्य नियोजनकार रविंद्रकुमार मानकर, सहयोगी नियोजनकार शुभांगी भिष्णूरकर, अधिकारी उपस्थित होते.