Breaking News

कर्जतमध्ये पावसाची संततधार

 पालिका प्रशासन सतर्क, आपत्ती व्यवस्थापन संस्थांकडून आढावा

कर्जत : बातमीदार

मागील तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरु असल्याने कर्जत नगर परिषद प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक घेण्यात आली.

कर्जत तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत जोरदार पाऊस पडत आहे. 2021 मध्ये उल्हास नदीला पूर येऊन पुराचे पाणी शहरात घुसले होते. त्याचा फटका शहारातील तब्बल 5500 नागरिकांना बसला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने कर्जतमधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, बाधित भागातील नागरिक, स्वयंसेवी संस्था यांची आढावा बैठक घेतली. नगर परिषद कार्यालयात झालेल्या या बैठकील नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे, नगरसेविका संचिता पाटील, वैशाली मोरे, माजी नगरसेवक संतोष पाटील, दीपक मोरे, मुख्याधिकारी सुरेखा भणगे, नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे, नगर अभियंता मनीष गायकवाड, अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख लक्ष्मण माने यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहरात रेस्क्यू टीमकडून सल्ले घेण्यात आले आणि आपत्तीच्या काळात कशा पद्धतीने कामे करायला हवीत याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीत कर्जत शहरातील संभाव्य पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याचा सूचना देण्यात आल्या. सतत पाऊस सुरु असल्यास टेकडी खालील किंवा डोंगराच्या बाजूला असलेल्या धोकादायक घरांमध्ये नागरिकांनी थांबू नये, अशा सूचना देण्यासाठी दवंडी देण्यात येणार आहे. तर उल्हास नदीचे पाणी घुसण्याची शक्यता असलेेल्या भागातील नागरिकांनी आपले किमती साहित्य सुरक्षीत ठिकाणी हलविण्याची सूचना आपत्ती व्यवस्थापन बैठकीत करण्यात आली. पूरचे पाणी आल्यास त्याची माहिती  नगर परिषदेच्या नियंत्रण कक्षात देण्याची सूचना स्वयंसेवी संस्थांना करण्यात आली. संभाव्य पूरग्रस्त भागात नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे मोबाइल क्रमांकांची माहिती प्रसिद्ध करण्याची सूचना करण्यात आली असून या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल, असे मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी जाहीर केले.

साथीचे आजार दूषित पाण्यापासून होत असतात आणि त्यामुळे सर्वांनी पाणी उकळून व गाळून प्यावे. आपत्तीच्या काळात घरात न थांबता घराबाहेर पडावे तसेच कोणत्याही परिस्थिती कुठल्याही झाडाखाली उभे राहू नये.

-सुवर्णा जोशी, नगराध्यक्ष, कर्जत नगर परिषद

शहरात पूरचे पाणी घुसून वित्तहानी होऊ नये, यासाठी नगरपालिका प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनीदेखील संभाव्य धोक्याची माहिती पालिकेला दिली तर, आपत्ती रोखण्यासाठी जलदगतीने कार्यवाही करता येईल.

-सुरेखा भणगे, मुख्याधिकारी, कर्जत नगर परिषद

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply