कर्जत : बातमीदार
भारत दूरसंचार निगम (बीएसएनएल)ची ब्रॉड बँड सेवा कर्जत तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून कार्यरत नाही. त्यामुळे प्रामुख्याने टपाल कार्यालय, बँकांचे व्यवहार आणि दूरध्वनी संच जवळपास बंद पडले आहेत. दरम्यान, इंटरनेट सेवा ही सर्वात महत्वाची सेवा असून त्यात तात्काळ सुधारणा करावी, अशी मागणी बीएसएनएलच्या पनवेल येथील मुख्य अभियंत्यांकडे करण्यात आली आहे.
पनवेल येथून ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात बीएसएनएलची ब्रॉडबँड सेवा दिली जाते. तालुक्यातील सर्व बँका त्याचप्रमाणे टपाल कार्यालयांत बीएसएनएलची सेवा आहे. बीएसएनएलची ब्रॉड बँड सेवा जलद असल्याने शासकीय आणि खासगी कार्यालयांचे व्यवहारही या इंटरनेट सेवेवर अवलंबून आहेत. मात्र तालुक्यातील रस्त्यांच्या कामात बीएसएनएलच्या वाहिन्या तुटत असल्याने इंटरनेट सेवा वारंवार बंद होत आहे. त्याचा मोठा फाटका टपाल कार्यालयाला बसला असून, ग्राहकांना आपले हक्काचे पैसे पोस्ट बँक खात्यातून काढता येत नाहीत. अन्य बँकांचेही आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. कर्जत आणि माथेरान नगरपालिका आणि कर्जत तहसील कार्यालयांची सेवा व व्यवहारही कोलमडले आहेत. बीएसएनएलच्या इंटरनेट घोळामुळे सबरजिस्टर कार्यालयात खरेदी व्यवहार बंद पडले आहेत. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. दरम्यान, खासगी इंटरनेटवर अवलंबून असलेल्या बँकांचे फावले असून, त्यांचे आर्थिक व्यवहार मात्र जोरात सुरू आहेत. कर्जत तालुक्यातील इंटरनेट सेवा सुधारावी, अशी मागणी कर्जत तालुका बार असोसिएशनने पाहिजे अशी मागणी केली आहे. दरम्यान, रस्त्यांच्या कामांत ठिकठिकाणी ऑप्टिकल केबल तुटत असल्याने इंटरनेट सेवा बंद पडत असल्याचे बीएसएनएलचे पनवेल येथील अधिकारी सांगत आहेत.