Breaking News

तांत्रिक बिघाडामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित

वाशी, कोपरखैरणे परिसरात जनित्र जळाल्याने अडचण; पनवेलकरही हैराण

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

वाशी, कोपरखैरणे परिसरात जनित्र जळाल्याने गुरुवारी (दि. 5) सकाळपासून पनवेल व नेरुळ परिसरात महापारेषणच्या मुख्य वीजवाहिनीत बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दुपापर्यंत हळूहळू वीजपुरवठा पूर्ववत झाला. वीज नसल्याने लघुउद्योजकांनाही फटका बसला तर आधीच उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांचे मात्र मोठे हाल झाले.

वाशी येथील वीजपुरवठा केंद्रातील जनित्रात तांत्रिक बिघाड झाल्याने वाशी व कोपरखैरणे परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. पाच तासांच्या दुरुस्ती कामानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला, तर महापारेषणच्या तळेगाव ते नेरुळ या मुख्य वीजवाहिनीत बिघाड झाल्याने नेरुळसह पनवेल परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. तापमान वाढीमुळे सध्या विजेची मागणी वाढली आहे. त्यात गेली काही दिवस नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरात वीजपुरवठा अधूनमधून खंडित होत आहे. त्यामुळे वीज ग्राहक त्रस्त आहेत. त्यात गुरुवारी वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाडामुळे बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे दुपापर्यंत विजेविना राहावे लागल्याने वीजग्राहकांनी संताप व्यक्त केला.

वाशी सेक्टर 29 येथील विद्युत जनित्र सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने जळाले. त्यामुळे महावितरणने तातडीने दखल घेत या केंद्रावरून होत असल्याला भागाचा वीजपुरवठा खंडित केला. दोन तासांत दुरुस्ती करीत जनित्र बसवण्यात आले. मात्र यात महावितरणने पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीची कामेही यात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वाशी सेक्टर 26,28,29 व 15 चा काही भाग तसेच वाशी स्टेशन परिसरातील सेक्टर 16 व 17 यासह कोपरखैरणे विभागातील बोनकोडे, खैरणेगाव, सेक्टर 1 ते 11 या परिसरात सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. सुमारे पाच तासांनंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला.

तळेगाव ते खारघर अशी महापारेषणची 400 मेगावॉटची मुख्य वीजवाहिनी असून त्यात तांत्रिक बिघाड (ब्रेक डाऊन) झाल्याने पनवेल परिसरातीत काही ठिकाणी सकाळी 11 ते 12 तर काही ठिकाणी दुपारी दोन ते तीन दरम्यान वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. कामोठे येथील 33 मेगावॉटच्या वीजवाहिनीतही बिघाड झाल्याने कामोठे खारघर, नेरुळ, बेलापूर येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

28 एप्रिल रोजीही पडघा येथील विद्युत पारेषण केंद्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दीड ते तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. कधी तांत्रिक बिघाड तर कधी देखभाल दुरस्ती कारणास्तव वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीजग्राहक त्रस्त आहेत.

महापारेषणच्या वीजवाहिनीत बिघाड झाल्याने पनवेल परिसरात तातडीचे भारनियमन करण्यात आले. मात्र एकाच वेळी वीजपुरवठा खंडित न करता नोडनुसार एक एक तासाचे भारनियमन करण्यात आले.

-सतीश सरोदे, कार्यकारी अभियंता, महावितरण

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply