Breaking News

कणखर नेतृत्वासाठी मोदींना साथ द्या

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

अलिबाग : प्रतिनिधी

यंदाची लोकसभा निवडणूक देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. देेशातील आतंकवाद व नक्षलवाद मुळापासून उपटून टाकण्यासाठी देशात भक्कम स्थिर सरकारची आवश्यकता आहे. देशाला कणखर नेतृत्वाची गरज आहे. ते कोण देऊ शकतं याचा विचार करा आणि देशाच्या सुरक्षेचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला मतदान करा, असे आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रायगड जिल्ह्यातील मतदारांना केले. अलिबाग येथे शनिवारी (दि. 20) आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या प्रचारार्थ अलिबाग येथील जयमाला गार्डन येथे सभा झाली. या सभेस उमेदवार ना. गीते, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय पोतनीस, माजी मंत्री रवीशेठ पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, अ‍ॅड. महेश मोहिते, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, महेंद्र दळवी, सुरेंद्र म्हात्रे, विजय कवळे, आरपीआयचे कोकण प्रदेश अध्यक्ष, नगरसेवक जगदीश गायकवाड, भाजपचे तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील आदी उपस्थित होते. या वेळी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसची देशात 50 वर्षे सत्ता होती, परंतु त्यांनी चुकीची आर्थिक धोरणे राबवली, भ्रष्टाचार केला. त्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन नव्हता. त्यामुळे देशाचा विकास होऊ शकला नाही. देश श्रीमंत झाला, परंतु देशातील जनता गरीब राहिली, अशी टीका ना. नितीन गडकरी यांनी केली.

विरोधकांकडे आता कोणताच मुद्दा नाही. केवळ मोदी हटाव हाच त्यांचा नारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविण्यासाठी अनेक पक्ष एकत्र आले आहेत, मात्र ही संधीसाधूंची आघाडी आहे. याच्या कडबोळ्याचे सरकार आले, तर देशाचा विकास होणार नाही. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका. देशाच्या विकासासाठी मजबूत व स्थिर सरकारची गरज आहे. ते केवळ भाजपच देऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाला सुरक्षित ठेवू शकतात व देशाचा विकास करू शकतात. त्यामुळे भापजप्रणीत एनडीएच्या उमेदवारांनाच मतदान करा, असे आवाहन ना. गडकरी यांनी केले.

सुनील तटकरे, जयंत पाटील व मधुकर ठाकूर हे स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. जनेतने त्यांचा स्वार्थ ओळखला असून, सुज्ञ जनता अनंत गीते यांनाच निवडून देईल, असा विश्वास आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.

2014 साली आम्ही चारित्र्यसंपन्न अशा अनंत गीते यांच्या विरोधात काम केले होते. आमच्याकडून ते पाप झाले. ते या वेळी धुवून काढणार आणि अनंत गीते यांना पुन्हा निवडून आणणार, असे अ‍ॅड. महेश मोहिते म्हणाले.

अनंत गीते यांच्यासारख्या प्रामाणिक माणसाला निवडून द्या, असे आवाहन आरपीआयचे जगदीश गायकवाड यांनी केले. विजय कवळे यांचेही भाषण झाले. सभेचे सूत्रसंचालन मिलिंद पाटील यांनी केले.

विरोधकांना जनता धडा शिकवणार -ना. अनंत गीते

रायगडातील तीन बँका ज्यांनी बुडवल्या ते सर्व नेते आता निवडणुकीत एकत्र आले आहेत. त्यांना जनता धडा शिकवणार आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची सूत्र हलवली जात आहेत. यांना मी स्वस्थ बसू देणार नाही. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागे चौकशीची साडेसाती लावून त्यांची झोप उडवणार, असा इशारा रायगड उमेदवार अनंत गीते यांनी या वेळी दिला. पेण-अलिबाग रेल्वे सुरू करणे, अलिबाग पर्यटनस्थळ म्हणून आंतरराष्ट्रीय नकाशावर नेणे, सांबरकुंड धरब बांधणे याला आपण प्राधान्य देणार आहोत, असेही गीते म्हणाले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply