जि. प. सदस्या कुंदा ठाकूर यांची चौकशीची मागणी
उरण : प्रतिनिधी : उरण तालुक्यातील कंठवली गाव ते कातकरीवाडी रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, सदर रस्त्याच्या कामाची खातेनिहाय चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जासई जिल्हा परिषद मतदारसंघातील रायगड जिल्हा परिषद सदस्या कुंदा ठाकूर यांनी केली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या फंडातून हा रस्ता बांधण्यात येत असून, या ठेकेदाराने निविदेप्रमाणे कामच केले नाही व सदरचे कामही अर्धवट अवस्थेत आहे. या रस्त्याच्या कामाबाबत येथील आदिवासींची तक्रार असून, सुमारे 15 लाख रुपये खर्चाचा हा रस्ता बनविण्यात आला आहे, मात्र या कंठवली गावातील 200 मीटरचा भाग निविदेमध्ये असतानाही या ठेकेदाराने तो न बनवता अर्धवट अवस्थेत ठेवला आहे. त्याचप्रमाणे या रस्त्याच्या डांबरीकरणामध्ये खडी आणि ग्रीटचा अधिक प्रमाणात वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता पहिल्या पावसातच वाहून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेकडून कर्जत येथील ठेकेदार समीर लोगले यांच्यामार्फत हे रस्त्याचे काम करण्यात आले आहे, मात्र हे काम या ठेकेदाराने न करता कंठवली येथील एका सहठेकेदारामार्फत केले आहे. या सहठेकेदाराने या रस्त्याच्या कामाची मोठ्या प्रमाणात धूळधान केली आहे. त्यामुळे आदिवासींना या रस्त्याच्या उखडलेल्या खाडीवरूनच चालावे लागणार असल्याने आदिवासीमंध्ये या ठेकेदाराबाबत मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.जिल्हा परिषदेकडून नोंदणीकृत असलेल्या ठेकेदारांनाच कामाचे ठेके देण्यात येतात, मात्र प्रत्यक्षात नोंदणीकृत ठेकेदाराला सहठेदारामार्फत ठरलेली कमिशन रक्कम देण्यात येते. त्यामुळे कोणताही तथाकथित ठेकेदार ही कामे करत असतो. यामध्ये जिल्हा परिषदेतील बांधकाम खात्यांचे अभियंते या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी उकळत असल्याने कामाचा दर्जा खालावतो. त्यामुळे अशा प्रकारच्या कामांच्या पद्धती बंद करण्यात याव्यात, अशी मागणी कुंदा ठाकूर यांनी शेवटी केली आहे. या निकृष्ट कामाबाबत पनवेल येथील बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल जाधव यांना विचारणा केली असता कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.