पाणीपुरवठा योजनेतील कंत्राटी कामगार संपावर
कर्जत : बातमीदार
कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने नेरळ जवळील कुंभे येथून उल्हास नदीवरून माथेरान होणारा पाणीपुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शार्लोट लेकमधून माथेरानला पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचा परिणाम माथेरानमधील पर्यटन हंगामावर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, माथेरान नळपाणी योजनेतून ज्या चार आदिवासी वाड्यांना पिण्याचे पाणी पुरविले जाते त्या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
माथेरानमधील शार्लोट लेक तसेच नेरळ कुंभे येथून उल्हास नदीचे पाणी जलवाहिनीमधून घेऊन माथेरानला पाणीपुरवठा केला जातो. कुंभे येथील उद्भव ठिकाणापासून जुम्मापट्टी आणि वॉटरपाईप अशा दोन ठिकाणी जलवाहिनीतून येणारे पाणी वेगाने माथेरानमधील जलशुद्धीकरण केंद्रात पोहचावे, यासाठी पंप हाऊस बनविण्यात आले आहेत. हे पंप हाऊस आणि कुंभे येथे पाणी सोडण्याचे काम गेल्या 30 वर्षांपासून स्थानिक तरुण करतात. कंत्राटी तत्वावर काम करणारे हे 17 कामगार जुम्मापट्टी, माणगाव वाडी, कुंभे येथील स्थानिक भूमिपूत्र आहेत. पगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने या कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे उल्हास नदी येथून माथेरानला होणारा पाणीपुरवठा बंद आहे.
माथेरानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक असून शहरातील केवळ शार्लोट लेकमधून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे माथेरानमध्ये मोठी पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तात्काळ कंत्राटी कामगारांचा प्रश्न निकाली काढण्याची गरज आहे.
आदिवासी वाड्यांत पाणीटंचाई
माथेरान नळ पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्या नेरळ ग्रामपंचायत हद्दीतून जात असल्याने स्थानिक आदिवासी वाड्यांना या जलवाहिन्यामधून पिण्याचे पाणी दिले जाते. कंत्राटी कामगारांच्या कामबंद आंदोलनामुळे जुम्मापट्टी, धनगर वाडा, धसवाडी आणि माणगाव वाडी या चार ठिकाणी मागील तीन दिवस पाणी गेले नाही आणि त्यामुळे तेथील आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
माथेरानमध्ये सध्या पर्यटन हंगाम असल्याने कुंभे येथून पाणी उचलणे थांबणे, हे धोक्याचे आहे. ही योजना जीवन प्राधिकरण चालवीत असल्याने त्यांच्या कामगारांचा प्रश्न त्यांनी निकाली काढून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत जीवन प्राधिकरण बरोबर संपर्क केला आहे. शार्लोट लेकमध्ये पाणीसाठा वाढविण्यासाठी गाळ काढणायचे काम मंजूर केले असून ते लवकर सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-सुरेखा भणगे, प्रशासक, माथेरान नगर परिषद
त्या 17 कंत्राटी कामगारांच्या पगाराचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आजच हा प्रश्न मार्गी लावून कुंभे येथून पाणी उचलण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
-एस. ए. भोसले, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पनवेल
RamPrahar – The Panvel Daily Paper