Breaking News

हिंदुत्वासाठी चढाओढ

भारतीय जनता पक्ष सोडला तर बाकीचे बहुतेक पक्ष सध्या स्वत:चे हिंदुत्व सिद्ध करण्याच्या चढाओढीत मग्न दिसतात. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच मशिदींवरील भोंग्यांना पर्याय सुचवला. हा पर्याय होता, मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा. राज ठाकरे यांच्या या मोहिमेनंतर भाजप मनसेच्या अधिक जवळ येईल असा अंदाज बांधून भाजपवरच तोंडसुख घेणे सुरू झाले. आता उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर या चढाओढीच्या नाट्याला आणखी एक वळण मिळाले आहे.

पेट्रोल-डिझेल किंवा घरगुती गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. महागाईने सामान्य नागरिक हैराण होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत खरे तर जनतेने आंदोलनाचा पवित्रा घेतला असता तरी नवल वाटले नसते. शेजारच्या श्रीलंकेमध्ये नेमके तेच घडले आहे आणि आजही घडते आहे. भारतात मात्र इतकी वाईट परिस्थिती नाही हे विरोधकांना देखील मान्य करावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने वेळीच उचललेल्या पावलांमुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था श्रीलंकेप्रमाणे मोडकळीस आलेली नाही. महागाईच्या झळा सर्वांनाच लागत असल्या तरी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही आणि जाणारही नाही याचा विश्वास जनतेला वाटतो. भारतीय जनता पक्षाच्या यशस्वी कारभारामुळे अस्वस्थ झालेल्या विरोधीपक्षाला याचेच वैषम्य वाटते. महागाईसारखे त्रासदायक मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी न राहता भोंगे, हनुमान चालिसा, हिंदुत्व अशाच विषयांना बळ कसे मिळते असा प्रश्न त्यांना पडतो. देशातील आणि महाराष्ट्रातील राजकीय विश्व सध्या याच मुद्द्यांनी ढवळून निघालेले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न ऐरणीवर आणला. हा प्रश्न तसा जुनाच होता, परंतु यावेळी राज ठाकरे यांनी त्यास नव्या मोहिमेचे वळण दिले. राज ठाकरे यांनी यासंदर्भात दोन भाषणे केली. पण त्यानंतर भाजप सोडल्यास बाकी सार्‍या पक्षांचे नेते आपण हिंदू कसे आहोत आणि आपली देवावरील श्रद्धा किती अढळ आहे हे दाखवण्याची धडपड करू लागले. एरव्ही सर्वधर्मसमभावाचे गोडवे गाणारे आणि लांगुलचालनाच्या सर्व मर्यादा ओलांडणारे मोठमोठे नेते देवळातील देवदर्शनाचे फोटो समाजमाध्यमांवर टाकू लागले. मनसेशी नजिकच्या भविष्यात युती करण्याचे कोणतेही इरादे नाहीत असे प्रदेश भाजपचे नेते वारंवार स्पष्ट करत होते. तरीही त्यावर विरोधीपक्षांचा विश्वास बसला नाही. मुंबईतील उत्तर भारतीयांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेले अत्याचार विसरता येण्याजोगे नाहीत. त्याखातर राज यांनी आधी उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी केली. राज ठाकरे येत्या 5 जून रोजी श्री रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाण्याच्या विचारात आहेत. त्यांचा हा दौरा आता कसा पार पडतो हे बघायचे. या सर्व गदारोळामध्ये आणखी भर घातली ती नवनीत व रवी राणा या दाम्पत्याने. कोर्टकज्जे आणि तिखट प्रत्युत्तरे यामुळे सत्ताधारी शिवसेना मात्र कोंडीत सापडल्याचे चित्र निर्माण झाले. या पक्षाची हिंदुत्वाची झूल केव्हाच उतरली आहे. ती पुन्हा खांद्यावर कशी घ्यायची हाच शिवसेनेच्या पुढ्यातला कळीचा प्रश्न आहे. या धामधुमीमध्ये फक्त भाजपला आपले हिंदुत्व सिद्ध करावे लागले नाही यातच सारे काही आले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply