भाऊचा धक्कापर्यंतचा जलप्रवास होणार सुरळीत
उरण : रामप्रहर वृत्त
मोरा बंदरातील चार कोटी रुपये खर्च करून एक लाख 18 हजार 927 क्युबिक मीटर साचलेला गाळ काढण्यात आला आहे. यामुळे भाऊचा धक्कापर्यंतचा जलप्रवास सुरळीत होणार आहे. समुद्राच्या ओहोटीमुळे बंद ठेवण्यात येणारी समस्या दूर झाली असल्याची माहिती मुंबई बंदर विभागाच्या कार्यालयातून देण्यात आली.
मोरा बंदरात साचलेल्या गाळामुळे मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक ओहोटीमुळे बंद करावी लागत होती. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत होती. सातत्याने विस्कळीत होत असलेली उरण-भाऊचा धक्का प्रवासी लाँचसेवा सुरळीत करण्यासाठी मोरा बंदरातील साचलेला गाळ काढण्याला मे महिन्यांपासूनच सुरुवात करण्यात आली होती. ड्रेसिंग करून साचलेला गाळ काढण्याच्या कामासाठी चार कोटींची तरतूद करून निविदाही काढल्या होत्या. चार कोटी रुपये खर्चून मे महिन्याअखेरीस हे काम पूर्ण करण्याची मुदत होती.
यानुसार मोरा बंदरातील एक लाख 18 हजार 927 क्युबिक मीटर साचलेला गाळ काढण्यात आला आहे. मुदतीत गाळ काढण्यात आल्याने आता ओहोटीमुळे प्रवासी वाहतुकीला आता ब्रेक लागणार नसल्याने दररोज प्रवास करणार्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला असल्याची माहिती मुंबई बंदर विभागाच्या कार्यालयातून देण्यात आली.