Breaking News

देशहितासाठी मोदींनाच पंतप्रधान बनवा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जनतेला आवाहन

पाली : प्रतिनिधी

केंद्र व राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत असून, सरकारच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला भेडसावणारे विविध प्रश्न व समस्या सोडविण्याचे काम केले जात आहे. दुर्गम दुर्लक्षित भागासह ग्रामीण व शहरी भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय योजना व नवनवीन उपक्रम कार्यान्वित करण्यात आले आहेत. सबका साथ सबका विकास हे ब्रिद घेऊन कामांना गती मिळाली आहे. त्यामुळे लोकहितार्थ आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान बनवावे, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

सुधागड तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी (दि. 19) पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी मंत्री रवीशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ना. चव्हाण बोलत होते. पेण-सुधागड-रोहा मतदारसंघात भाजप, शिवसेना, रिपाइं युतीचा आमदार होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सोहळ्यास भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुनील दांडेकर, चिटणीस राजेश मपारा, सुधागड तालुका अध्यक्ष राजेंद्र राऊत, युवा नेते वैकुंठ पाटील, जि. प. सदस्य रवींद्र देशमुख, मराठा सुराज्य संघाचे अध्यक्ष प्रणय सावंत, माजी उपसभापती व्ही. बी. पाटील, जिते सरपंच वासुदेव म्हात्रे, तरणखोप सरपंच अभिजीत पाटील, उपसरपंच प्रकाश पाटील, श्रीकांत पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते गणपत दळवी, जांभुळपाडा सरपंच श्रद्धा कानडे, चंद्रकांत घोसाळकर, माजी सरपंच गणेश कानडे, शिरीष सकपाळ, रवींद्र खंडागळे, नीलेश आवसरे, सुनील झुंजारराव, संदीप दबके, अश्विनी रुईकर, गणेशबुवा देशमुख, आतोणेचे सरपंच रोहन दगडे, अडुळसे सरपंच भाऊ कोकरे, निखिल शहा, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

राज्य व देशात भाजप, शिवसेना, रिपाइं युतीच्या माध्यमातून तळागाळात विकासकामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, मजूर, कामगार, गोरगरीब, मध्यमवर्गीयांच्या हितासाठी सरकार काम करीत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गावागावातील रस्ते मुख्य मार्गाला जोडून समृद्धी आणण्याचे काम सरकार करीत आहे. जलशिवार योजना, मागेल त्याला शेततळे, भाताला योग्य हमी भाव, शेतकरी सन्मान योजना, नदीजोड प्रकल्प, आयुष्यमान भारत योजना आदींद्वारे सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याचे काम युती सरकारकडून होत आहे, असे सांगून शासनाच्या लोकाभिमुख व जनकल्याणकारी योजना लाभार्थी घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले पाहिजे, असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सूचित केले. मागील 10 वर्षे सुधागड तालुका विकासापासून वंचित ठेवणार्‍या व केवळ थापा मारणार्‍यांना आता थारा देऊ नका. केवळ निवडणुकांत विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी विविध पक्ष पुढे येतात, मात्र जनतेने कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता विकासकामे करणार्‍या भाजप, शिवसेना, रिपाइं पक्षांच्या युतीलाच भरभक्कमपणे साथ देऊन देशाच्या विकासाला गती व चालना द्या, असे आवाहन शेवटी पालकमंत्री चव्हाण यांनी केले.

मतदारसंघात विकासाची गंगा आणणार : रवीशेठ पाटील
या वेळी माजी मंत्री रवीशेठ पाटील म्हणाले की, मंत्रिपदी असताना पेण-सुधागड-रोहा मतदारसंघात विकासकामांना व लोकहिताला सर्वाधिक प्राधान्य दिले. या मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून पुन्हा विकासकामांचा झंजावात सुरू झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदार म्हणून संधी द्या. मतदारसंघात विकासाची गंगा आणेन. सर्वसामान्य जनतेला भेडसावणारे प्रश्न व समस्या सोडविण्यावर भर देणार असून, येत्या काळात गाव तिथे रस्ता व समस्यामुक्त तालुका करणार असल्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीत पेण-सुधागड-रोहा मतदारसंघातून युतीच्या उमेदवाराला बहुमतांनी विजयी करण्यासाठी सर्वतोपरी ताकद लावणार आहोत.
-राजेंद्र राऊत, अध्यक्ष, सुधागड तालुका भाजप

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply