स्पेन : वृत्तसंस्था
जून-जुलैमध्ये होणारी युरो चषक फुटबॉल स्पर्धा कोरोनामुळे 2021पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय युरोपियन फुटबॉल संघटनेने मंगळवारी
घेतला आहे.
युरो-2020 स्पर्धा आता युरो-2021 होऊन ती 11 जून ते 11 जुलै 2021 या कालावधीत खेळवण्याचा प्रस्ताव ‘यूएफा’ने मान्य केला आहे. ‘यूएफा’ने 55 संलग्न देशांच्या पदाधिकार्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही तातडीची आपत्कालीन बैठक आयोजित केली होती. त्यानंतर युरो चषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा अंतिम निर्णय यूएफाच्या कार्यकारी समितीने घेतला, अशी माहिती स्वीडन फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष कार्ल-एरिक निल्सॉन यांनी दिली. युरो चषकाच्या इतिहासात प्रथमच स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला.
युरो चषक स्पर्धा यंदा एका देशात न खेळवता युरोपातील विविध देशांतील 12 शहरांमध्ये खेळवण्यात येणार होती. उपांत्य आणि अंतिम लढत मात्र लंडनमध्येच होणार होती, पण ही स्पर्धाच आता वर्षभर लांबणीवर पडली आहे.
-कोपा अमेरिका स्पर्धासुद्धा एक वर्ष पुढे ढकलली
अॅसूनशिऑन : अर्जेटिना आणि कोलंबिया येथे जूनमध्ये होणारी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा कोरोनामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे. दक्षिण अमेरिका खंडामधील ही प्रतिष्ठेची स्पर्धा 12 जून ते 12 जुलै या कालावधीत प्रथमच दोन देशांत होणार होती.